कोरोना विषाणूचे सहा रुग्ण संशयीत; तीन मेडिकलमध्ये तर तीन मेयोमध्ये दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 07:29 PM2020-03-11T19:29:21+5:302020-03-11T19:30:35+5:30
दुबईहून प्रवास करून आलेल्या पुण्यातील दोन प्रवासी मंगळवारी कोरोना बाधित आढळून आले.
नागपूर : कोरोना विषाणूच्या संशयीत रुग्णांची संख्या वाढत आहे. मेडिकलमध्ये तीन तर मेयोमध्ये तीन संशयीत रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. यातील पाच रुग्णांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. सायंकाळी ७ वाजेनंतरच याचा अहवाल येण्याची शक्यता आहे.
दुबईहून प्रवास करून आलेल्या पुण्यातील दोन प्रवासी मंगळवारी कोरोना बाधित आढळून आले. यामुळे त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेतल्यानंतर आरोग्य विभागाला यवतमाळ जिल्ह्यातील १० तर नागपुरातील तीन प्रवासी आढळून आले. यवतमाळ येथील दहाही प्रवाशांची प्रकृती बरी असल्याने आणि कुठलेही लक्षणे आढळून आलेली नाहीत. यामुळे त्यांचे नमुने घेण्यात आलेले नाहीत. परंतु त्यांना घरीच थांबण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
विभागाचे कर्मचारी दिवसातून दोन वेळा त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारणा करीत आहे. कोरोना विषाणू रुग्णासोबत प्रवास करून आलेल्या नागपुरातील एकाच कुटुंबातील तीन सदस्य आहे. यात त्यांचा मुलगा पुण्यात थांबला असून त्याचे आई-वडिल नागपुरात आले आहे. मेडिकलने त्यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांना कोरोनाशी संबंधित कुठलेही लक्षणे आढळून आली नाहीत. परंतु खबरदारी म्हणून त्यांना घरीच थांबण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
तुर्तास होळीच्या दिवशी एक तर बुधवारी दोन रुग्णांना लक्षणे आढळून आल्याने त्यांना मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये भरती करण्यात आले आहे. यातील एक रुग्ण सौदी अरेबिया, एक पुणे तर एक इटली येथून प्रवास करून आला आहे. यातील दोघांचे नमुने आज मेयोमध्ये पठाविण्यात आले. दुसरा रुग्ण उशीरा मेडिकलमध्ये दाखल झाल्याने उद्या गुरुवारी त्याचे नमुने पाठविले जाणार आहे. दरम्यान मेयोमध्ये आज तीन संशयीत रुग्णांचे नमुने घेण्यात आले असून रात्री ७ वाजेनंतर त्याचा अहवाल येणार आहे.