सहा जणांना पाच वर्षांची शिक्षा

By admin | Published: February 26, 2016 03:08 AM2016-02-26T03:08:26+5:302016-02-26T03:08:26+5:30

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरीनगर एलआयजी कॉलनी येथील एका कुटुंबावरील खुनी हल्लाप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने ...

Six people have a five-year sentence | सहा जणांना पाच वर्षांची शिक्षा

सहा जणांना पाच वर्षांची शिक्षा

Next

१९ वर्षांनंतर न्याय :भाजप नगरसेवकाच्या भावाचा समावेश
नागपूर : कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरीनगर एलआयजी कॉलनी येथील एका कुटुंबावरील खुनी हल्लाप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने हंसापुरी येथील भाजपचे नगरसेवक आणि मनपाच्या विधी समितीचे सभापती संजयकुमार बालपांडे यांच्या सख्ख्या भावासह सहा जणांना पाच वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर अन्य एका आरोपीची निर्दोष सुटका केली. हल्ल्याची ही थरारक घटना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी १० नोव्हेंबर १९९६ रोजी घडली होती. न्यायालयाने गुरुवारी या खटल्याचा निकाल सुनावला आणि तब्बल १९ वर्षानंतर एका भयग्रस्त कुटुंबाला न्याय मिळाला.
अरुणकुमार कृष्णराव बालपांडे (५३), भागवत गोपाळराव गुरव (६५), आशा भागवत गुरव (५६), रामदास गोपाळराव गुरव (६८), बबन ऊर्फ नारायण सुखलाल चौधरी (४५) आणि महेश गजानन वाडीभस्मे (३७), अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. संतोष उत्तमराव सूर्यवंशी (४६), असे निर्दोष सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणात एकूण १० आरोपी होते. त्यापैकी रामचंद्र चौधरी आणि नीळकंठ उडावले हे दोघे खटला सुरू असताना मरण पावले. मोहम्मद शफी मोहम्मद करीम आलम नावाचा आरोपी न्यायालयातून जामीन मिळाल्यापासून फरार झाला. अद्यापही तो गवसला नाही. या प्रकरणातील फिर्यादी ललिता रामदास मासूरकर, त्यांच्या दोन बहिणी ममता व कुंदा, भाऊ प्रशांत आणि आई शांताबाई रामदास मासूरकर, अशी त्यावेळी गंभीररीत्या जखमी झालेल्यांची नावे होती.
या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अरुणकुमार बालपांडे हा मयूर समाचार साप्ताहिकाचा संपादक असून त्याने नुकतीच वकिलीही सुरू केली होती. घटनेच्या वेळी म्हाडाची हिवरीनगर एलआयजी कॉलनी अस्तित्वात आली होती. त्यामुळे अनेक क्वॉर्टर रिकामे होते. रिकाम्या क्वार्टरपैकी ६/३ चा कब्जा अरुणकुमार बालपांडे याने करून या ठिकाणाहून मयूर समाचार हे साप्ताहिक सुरू केले होते. आरोपींपैकी भागवत गुरव आणि त्याची पत्नी आशा गुरव या दोघांनी ६/४ क्रमांकाच्या क्वॉर्टरचा ताबा घेऊन अनधिकृतपणे बालवाडी सुरू केली होती. ६/१ क्रमांकाच्या क्वॉर्टरमध्ये रामचंद्र चौधरीने दवाखाना सुरू केला होता. काही रिकाम्या क्वॉर्टचा वापर जुगार अड्डा भरवण्यासाठी केला जात होता. मासूरकर कुटुंबाकडून या अवैध प्रकारांबाबत म्हाडा आणि पोलिसांकडे वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. मासूरकर कुटुंब आरोपींच्या कृत्यांमुळे त्रस्त झाले होते.
आरोपींना ‘त्या’ कुटुंबाला क्वॉर्टरमधून हाकलायचे होते
या आरोपींना हिवरीनगर एलआयजी कॉलनी येथे राहणाऱ्या मासूरकर कुटुंबाला हुसकावून लावायचे होते. मासूरकर कुटुंबामध्ये फिर्यादी ललिता मासूरकर यांचे वडील रामदास मासूरकर, दोन भाऊ राजेश आणि प्रशांत मासूरकर, बहिणी ममता व कुंदा आणि आई शांताबाई , असे एकूण सात जण राहत होते. आरोपींनी या कुटुंबाला त्रस्त करून सोडले होते. घटनेच्या एक दिवस आधी आरोपींनी त्यांना मारहाणही केली होती. परंतु पोलिसांनी दोन्ही पक्षांकडील लोकांविरुद्ध कारवाई केली होती.
दिवाळीच्या दिवशी सर्वत्र लक्ष्मीपूजन आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. रामदास मासूरकर आणि त्यांचा मुलगा राजेश हे दोघे वगळता इतर सर्व जण घरी होते. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास आरोपींनी मासूरकर यांच्या खिडकीपुढे मोठमोठ्या आवाजांचे फटाके फोडणे सुरू केले होते. ‘या साल्यांना दिवाळी करू देऊ नाही, पाहून घेऊ’, असे ते म्हणत होते. आरोपींनी हातात लोखंडी रॉड, काठ्या आणि विटांचे तुकडे घेऊन मासूरकर यांच्या क्वॉर्टरमध्ये घुसून दिसेल त्याच्यावर हल्ला करायला सुरुवात केली होती. त्यांच्या या हल्ल्यात ललिता, भाऊ प्रशांत, दोन बहिणी ममता व कुंदा आणि आई शांताबाई मासूरकर गंभीररीत्या जखमी झाले होते. ललिताच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली होती. पोलीस उपनिरीक्षक पी. डी. पाडवी यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील गिरीश दुबे, फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. प्रशांत मासूरकर यांनी तर आरोपींच्या वतीने अ‍ॅड. आर. एच. रावलानी, अ‍ॅड. एस. आर. सोनी, अ‍ॅड. एन. व्ही. रुडे आणि अ‍ॅड. आर. के. तिवारी यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल मोहन चांदेकर आणि रमेश ठाकरे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Six people have a five-year sentence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.