चिनी नागरिकांसह सहा जणांना शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 09:23 PM2019-05-09T21:23:42+5:302019-05-09T21:26:38+5:30
गोमांस तस्करीप्रकरणी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चिनी नागरिकांसह सहा जणांना एक महिन्याची कैद किंवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (बडेगाव) : गोमांस तस्करीप्रकरणी सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने चिनी नागरिकांसह सहा जणांना एक महिन्याची कैद किंवा दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ली झी च्युन (५५), ल्यु युन चेंग (५१), ल्यु हाँग ग्वॉँग (५१) यांच्यासह वाहनचालक अफरोज मो. शेख (२९), दुभाषक देवेंद्र लालजी नगराळे (३१) रा. निमगाव आणि गोमांस विक्रेता वकील मो. आजम कुरैशी रा. खापा, अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सावनेर तालुक्यातील खापा पोलिसांनी १८ जानेवारीला गुप्त माहितीच्या आधारे गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनास पकडत खापा येथे चालत असलेल्या गोमांस खरेदी-विक्री प्रकाराचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत एकूण सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यामधे तीन चिनी नागरिकांचाही समावेश होता. त्यांचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले होते. खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुमगाव मॅगनीज खदान परिसरात चीनमधील एक कंपनी मॉयलसह संयुक्तपणे खदान विस्तारीकरणाचे काम करीत आहे. यामुळे येथे चिनी तंत्रज्ञ आणि कामगारही प्रकल्पात कामाला आहेत. चिनी कामगारांच्या मदतीला दुभाषक तसेच बाजारहाट आणि इतर कामांसाठी एक वाहन कंपनीने पुरविले होते. चिनी कामगार गोवंशीय मांसाहार घेतात आणि त्यामुळे ते गुप्तपणे मांस खरेदी करतात, अशी माहिती खापा पोलिसांना मिळाली. खबऱ्याद्वारे १८ जानेवारीला मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार हर्षल ऐकरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने नाकाबंदी करून एमएच ४० बीई ९४९७ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाला ताब्यात घेतले. वाहनात सापडलेले अंदाजे १० किलो मांस हे गाईचे असल्याचा अहवाल नागपूर येथील प्रयोगशाळेतून प्राप्त होताच, तीन चिनी कामगार आणि इतर तिघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५ च्या विविध कलमाखाली अटक करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. चिनी नागरिकांना भारतातील प्राणी संरक्षण कायद्याची माहिती नसल्याने आणि दुभाषकानेही न सांगितल्याने आमच्या हातून गुन्हा घडल्याचे त्यांनी कबूल केले. आरोपींनी न्यायालयात गुन्हा कबूल केल्यानंतर सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने नुकतीच सर्व गुन्हेगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड किंवा एक महिना कैदेची शिक्षा सुनावली.