लक्ष्मीनगर झोनमधील एकाच कुटुंबात सहाजण पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:10 AM2021-07-07T04:10:58+5:302021-07-07T04:10:58+5:30
नागपूर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना सोमवारी लक्ष्मीनगर झोनमधील एकाच घरात सहा रुग्ण आढळून आले. या सहाही रुग्णांना ...
नागपूर : कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना सोमवारी लक्ष्मीनगर झोनमधील एकाच घरात सहा रुग्ण आढळून आले. या सहाही रुग्णांना सौम्य लक्षणे असून खबरदारी म्हणून आमदार निवासात दाखल करण्यात आले आहे. यातील एका रुग्णाचा पुणे प्रवासाचा इतिहास आहे. निरीने यांचे नमुने हैद्राबादच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. यापूर्वी उमरेडमधील ‘डेल्टा प्लस’ संशयित आठ रुग्णांचे नमुने पाठविले होते. त्यात कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील ‘डेल्टा’ विषाणू आढळून आला होता.
सलग दोन महिन्यांपासून दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत कोरोनाचे अधिक रुग्ण बरे होत असताना मंगळवारी मात्र चित्र पालटले. २१ रुग्णांची नोंद झाली असताना त्याहून कमी, १६ रुग्ण बरे झाले. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,७७,२३० झाली असून, मागील दोन दिवसांपासून मृत्यूची संख्या ९,०३१वर स्थिरावली आहे. कोरोनाचा दैनंदिन ग्राफ सहा दिवसांपासून वर - खाली होत आहे. परंतु चिंतेचे कारण नाही. १९ जूनपासून रोजच्या रुग्णांची संख्या ५०च्या आत आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले होते. परंतु याच महिन्यातील ३० तारखेला ६,४६१ रुग्ण व त्याहून अधिक ७,२९४ रुग्ण बरे झाले होते. त्यानंतर सलग ६६ दिवस दैनंदिन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहात होती. परंतु मंगळवारी पहिल्यांदाच यात बदल झाला. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्क्यांवर गेला आहे.
- २४ दिवसांपासून ग्रामीणमध्ये शून्य मृत्यू
नागपूर जिल्ह्यात आज ६,५५८ तपासण्या झाल्या. पॉझिटिव्हिटीचा दर ०.३२ टक्के होता. शहरात १३, तर ग्रामीणमध्ये ८ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, सलग २४ दिवसांपासून ग्रामीणमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर, मागील सहा दिवसांत जिल्ह्यात ६ मृत्यूची भर पडली आहे.
:: कोरोनाची मंगळवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ६,५५८
शहर : १३ रुग्ण व ० मृत्यू
ग्रामीण : ८ रुग्ण व ० मृत्यू
ए. बाधित रुग्ण :४,७७,२३०
ए. सक्रिय रुग्ण : १५७
ए. बरे झालेले रुग्ण : ४,६८,०४२
ए. मृत्यू : ९,०३१