सहा टन प्लास्टिक जप्त : मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 11:19 PM2019-09-24T23:19:38+5:302019-09-24T23:21:08+5:30

मंगळवारी गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाने छापा घालून पाच लाखांचे सहा टन प्लास्टिक जप्त केले.

Six tons of plastic confiscated: Action by Municipal nuisance detection team | सहा टन प्लास्टिक जप्त : मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई

सहा टन प्लास्टिक जप्त : मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देगांजाखेत येथील व्यापाऱ्याच्या गोदामावर छापा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने वर्षभरापूर्वी प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी असूनही नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. महापालिकेतर्फे आजवर प्रामुख्याने छोट्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात होती. परंतु यामुळे प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी झालेला नाही. याला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने प्लास्टिकचा साठा करून विक्री करणाऱ्या मोठ्या व्यापाऱ्यांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. मंगळवारी गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाने छापा घालून पाच लाखांचे सहा टन प्लास्टिक जप्त केले.
प्राप्त माहितीनुसार, गोळीबार चौकालगतच्या गांजाखेत येथील गुरुनानक स्टोअर्सच्या गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा असल्याची माहिती उपद्रव शोध पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने संबंधित दुकानाच्या गोदामावर छापा मारला. यात सुमारे ५९५२ किलोच्या प्लास्टिकच्या वस्तूंचा साठा जप्त करण्यात आला. दुकानाचे मालक ओमप्रकाश वाधवानी हे गोदामातून चिल्लर व्यापाऱ्यांना हा माल पुरवीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
शासनाची बंदी असतानाही अनधिकृतरीत्या साठा आढळल्यामुळे शासन नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे. यापूवीर्ही या परिसरातून तीन लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला होता.
काही दिवसांपूर्वी बर्डी परिसरातही उपद्रव शोध पथकाने मोठी कारवाई करून प्लास्टिक साठा जप्त केला होता. सदर कारवाई स्वच्छ भारत अभियानचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, उपद्रव शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाच्या सदस्यांनी केली.

८७६ प्रकरणात ४४ लाखांचा दंड वसूल
प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिकेतर्फे प्लास्टिक मुक्त शहरचे आवाहन करण्यात आलेले आहे. तसेच प्लास्टिक बंदी निर्णयाची महापालिका क्षेत्रात कडक अंमलबजावणी सुरू आहे. मनपा आरोग्य विभाग(स्वच्छता) आणि उपद्रव शोध पथकाच्या माध्यमातून नियमित कारवाई करण्यात येते. दहाही झोनअंतर्गत सुमारे ८७ जणांचे पथक झोननिहाय कार्यरत आहे. शहरात आतापर्यंत उपद्रव शोध पथकाने ८७६ प्रकरणातून सुमारे ४४ लाखांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा
पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेने प्लास्टिक बंदी नियमांतर्गत महापालिका प्रशासनाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनीही यासाठी स्वत: पुढाकार घ्यावा, शहरातील मोठे व्यावसायिक अथवा चिल्लर दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत असेल त्याची माहिती महापालिका अधिकारी किंवा उपद्रव शोध पथकाला द्यावी, असे आवाहन आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे. अशा व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: Six tons of plastic confiscated: Action by Municipal nuisance detection team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.