उपराजधानीत काविळसदृश आजाराचे सहा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:01 AM2019-03-23T11:01:49+5:302019-03-23T11:06:16+5:30
वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाडी परिसरातील आंबेडकरनगर वॉर्डामध्ये काविळ पसरला आहे. गेल्या काही दिवसात येथे काविळसदृश आजारामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान तीन वर्षापासून वाडीला नगर परिषद घोषित केल्याने नगर परिषदेकडे आरोग्य यंत्रणाच नसल्याची बाब पुढे आली आहे.
आंबेडकरनगरला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी ही नाल्यातून गेली आहे. तसा वाडी परिसराला वेणा जलाशयातून पाणीपुरवठा होतो. गेल्या काही दिवसापासून वेणा जलाशयातून पाणी बंद केले आहे. त्यामुळे टॅँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. टँक रद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित असल्याने काविळ परिसरात पसरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दूषित पाण्यामुळे गेल्या काही दिवसापासून आजार पसरले असून स्वाती गायकवाड यांना नुकत्याच जुळ्या मुली झाल्या होत्या. तेव्हापासूनच आई आणि दोघी जुळ्या मुली काविळसदृश आजाराने ग्रस्त होत्या.
या तिघांचाही मृत्यू काविळने झाल्याचे बोलले जात आहे. काविळचा प्रकोप वाढत असल्याचे लक्षात घेता, जि.प.च्या आरोग्य विभागाने वाडीमध्ये इपॅडेमिक सेल तयार केला आहे. दोन डॉक्टरची तिथे नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर आशा वर्करच्या माध्यमातून सर्वे करण्यात आला आहे. ग्रा.पं.ला मेडिक्लोर दिले असून, पाणी उकळून व गाळून पिण्याचा सल्ला दिला आहे. तसेच नाल्यातून गेलेल्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन हेमके यांनी दिली आहे.
आरोग्य यंत्रणा उभी करावी
वाडीमध्ये यापूर्वीही साथ रोग पसरला होता. डेंग्यूचे रुग्णही आढळून आले होते. वाडीला नगर परिषदेचा दर्जा मिळाला आहे. पण नगर परिषदेची स्वत:ची आरोग्य यंत्रणा नाही. त्यामुळे दरवेळी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग धावपळ करून आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे. वाडीचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाल्याने नगर परिषदेने स्वत:ची आरोग्य यंत्रणा उभी करावी, अशी मागणी आरोग्य विभागातर्फे वेळोवेळी करण्यात आली आहे.