शाळा उघडून सहा आठवडे होऊनही कोरोनाचा धोका नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:07 AM2021-09-03T04:07:41+5:302021-09-03T04:07:41+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविला जात असताना त्यात ग्रामीण भागात १४ जुलैपासून सुरू झालेल्या ...
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविला जात असताना त्यात ग्रामीण भागात १४ जुलैपासून सुरू झालेल्या शाळांबाबत शंका व्यक्त केली जात होती. परंतु, आता सहा आठवडे होऊनही कोरोनाचा धोका जाणवला नसल्याने एक समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे.
कोरोना विषाणूचा प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव पडला. शिक्षण क्षेत्राला तर हादराच बसला. शाळा बंद पडून ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. मात्र, एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात ६३ टक्क्याने, मेच्या तुलनेत जून महिन्यात तब्बल ९६ टक्क्याने, जुलै महिन्यात ८० टक्क्याने, तर ऑगस्ट महिन्यात ८४ टक्क्याने रुग्णांत घट झाली. जून महिन्यात कोरोनाचा ग्राफ खाली येताच जुलै महिन्यात राज्यात कोविडमुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याला परवानगी देण्यात आली. यातही शाळेत पाठविण्यासाठी पालकांची मंजुरी गरजेची होती. सुरुवातीला कमी प्रतिसादानंतर आता बहुसंख्य शाळा पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव न वाढता उलट तो कमी होत असल्याचे दिसून आले आहे.
-जुलै महिन्यात १६३, तर ऑगस्ट महिन्यात २५ रुग्ण
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका व जुलै महिन्यात शाळा सुरू झाल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची भीती काहींनी वर्तवली होती. परंतु, ग्रामीणमध्ये रुग्ण उलट कमी झाले. जुलै महिन्यात १६३, तर ऑगस्ट महिन्यात ८४ टक्क्याने कमी होऊन २५ रुग्णांची नोंद झाली. यामुळे आता शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढू लागली आहे.
-शिक्षणासोबतच मुलांच्या विकासासाठी शाळा आवश्यक
एम्सचे संचालक रणदीप गुलेरीया यांच्या मते, शाळा केवळ मुलांच्या शिक्षणासाठी नव्हे, तर त्यांच्या एकूण विकासासाठीदेखील आवश्यक आहे. शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या माध्यान्ह भोजनामुळे अनेक मुलांचे पोट भरते. डिजिटल विभाजनामुळे अनेक गरीब मुले ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत, तर काही मुले शाळाबाह्य झाली आहेत.
-पहिल्या वर्गापासून शाळा सुरू होणे गरजेचे
शाळा बंद असली तरी मुले मैदानात खेळत आहेत, इतरांमध्ये मिसळत आहेत. यामुळे बंद शाळेचा कोरोनावर कोणताही प्रभाव पडत नाही. उलट शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कोरोनाचे नियम पाळून पहिल्या वर्गापासून शाळा सुरू करणे गरजेचे आहे.
-डॉ. विजय धोटे, अध्यक्ष अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स