लंडनहून परतेल्या महिलेसह सहा वर्षाच्या मुलाला मेडिकलमध्ये केले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:04 PM2020-12-30T23:04:57+5:302020-12-30T23:10:28+5:30
New corona, nagpur newsअधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रकारातील रुग्ण भारतात आढळून आले असून नागपुरात संशयित म्हणून आणखी दोन रुग्णांना बुधवारी मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आले. यात ६ वर्षीय मुलगा व ४३ वर्षीय महिला आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रकारातील रुग्ण भारतात आढळून आले असून नागपुरात संशयित म्हणून आणखी दोन रुग्णांना बुधवारी मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आले. यात ६ वर्षीय मुलगा व ४३ वर्षीय महिला आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ७ झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पुण्याच्या प्रयोगशाळेत पहिल्या ५ रुग्णांच्या पाठविलेल्या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.
ऑक्टोबरनंतर कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना या विषाणूमध्ये बदल झाल्याचे समोर आल्याने चिंता पुन्हा वाढली आहे. कोरोना विषाणूचे नवे रूप जास्त धोकादायक आणि संक्रामक असल्याचे म्हटले जाते. यातच देशात ७ रुग्णांना या विषाणूची बाधा झाल्याने अधिक खबरदारीचे उपाय करण्याचे आवाहन केले जात आहे. मंगळवारी मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यात आलेला मुलाला लंडनहून परतलेल्या त्याचा वडिलांपासून लागण झाली असावी, असा अंदाज आहे. प्राप्त माहितीनुसार, २७ नोव्हेंबर रोजी या मुलाचे वडील लंडनहून दिल्लीला पोहचले. दिल्लीहून ते रायपूरला २८ नोव्हेंबरला पोहचले. सात दिवस होम क्वारंटाईन राहिले. ६ डिसेंबरला रायपूर येथील एका लग्नसोहळ्यात उपस्थित होते. १४ डिसेंबर रोजी ते नागपुरात आले. मनपाच्या ट्रेसिंगनुसार त्यांची चाचणी करून मेडिकलमध्ये दाखल केले. आज त्यांच्या ६ वर्षीय मुलाच्या आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यालाही त्याच्या वडिलांसोबत विशेष वॉर्डात ठेवण्यात आले. मुलाला कुठलीही लक्षणे नाहीत.
४३ वर्षीय महिला मूळ मुंबई येथील राहणारी आहे. पाच वर्षानंतर ही महिला लंडनहून मुंबई येथे ५ डिसेंबर रोजी पोहचली. मुंबई येथे करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन चाचणीत निगेटिव्ह आली. ८ डिसेंबर रोजी मुंबई ते रायपूर व रायपूर ते बिलासपूर त्यांनी प्रवास केला. पुढील तीन दिवस तेथील एका लग्न सोहळ्यात सहभागी झाल्या. १२ डिसेंबर रोजी नागपुरात आल्या. वर्धमाननगर येथे थांबल्या होत्या. त्यांच्यासोबत लग्नात असलेल्या २० जणांना कोविडची लागण झाली आहे. याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला मिळताच त्यांनी २९ डिसेंबर रोजी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. परंतु त्यांना लक्षणे असल्याने आज मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती केले. आज दाखल झालेल्या दोन्ही रुग्णांचे नमुने मायक्रोबायोलॉजी विभागाच्यावतीने पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठविले. सध्या विशेष वॉर्डात एक मुलगा, तीन महिला व तीन पुरुष उपचार घेत आहेत.
अहवाल येईपर्यंत मेडिकलमध्येच राहावे लागणार
वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी आज मेडिकलच्या वरिष्ठ डॉक्टरांसोबत घेतलेल्या बैठकीत नव्या कोरोनाच्या संशयित रुग्णांबाबत विशेष सूचना केल्याची माहिती आहे. त्यानुसार, जोपर्यंत पुण्याच्या प्रयोगशाळेचा अहवाल येत नाही तोपर्यंत संशयित निगेटिव्ह असले तरी त्यांना मेडिकलमध्येच राहावे लागणार. यामुळे सर्वांनाच पुण्याच्या प्रयोगशाळेतील अहवालाची प्रतीक्षा आहे.