सीसीटीव्हीच्या साह्याने सापडला नागपूर रेल्वेस्थानकावर चुकलेला सहा वर्षांचा बालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:23 AM2017-12-26T11:23:15+5:302017-12-26T11:24:22+5:30
गर्दीत आपल्या नातेवाईकांपासून चुकामूक झालेल्या एका सहा वर्षांच्या बालकाला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने शोधल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : रेल्वेस्थानक वा जत्रेच्या गर्दीत लहान मुले हरवल्याच्या घटना आपल्या चित्रपटांच्या कथांना वर्षानुवर्षे विषय पुरवित आल्या आहेत. मात्र आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या घटनांवर मात करता येते आहे. अशीच एक घटना नागपूर रेल्वे स्टेशनवर घडली. गर्दीत आपल्या नातेवाईकांपासून चुकामूक झालेल्या एका सहा वर्षांच्या बालकाला रेल्वे सुरक्षा दलाने सीसीटीव्हीच्या साह्याने शोधल्याची घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजता घडली.
सोमवारी सकाळी ११.३० वाजता इसत्याक अहमद खान रा. शिलेवाडा, हवामहल नागपूर हे आपल्या सहा वर्षांचा नातू दस्तेकाम याला घेऊन त्याच्या आजोबाच्या भेटीसाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आले होते. आजोबांशी भेटून परत जात असताना गर्दीत त्यांच्या नातवासोबत त्यांची चुकामूक झाली. नातू हरविल्याचे लक्षात येताच त्यांनी रेल्वे सुरक्षा दल गाठून उपनिरीक्षक होतिलाल मीणा यांना घडलेली घटना सांगितली. मीणा यांनी लगेच आरपीएफ जवानांसोबत सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यांना हा बालक प्लॅटफार्म क्रमांक १ च्या इटारसी एन्डकडील भागात असलेला ओव्हरब्रीज उतरून एमसीओ गेटकडे जाताना दिसला. लगेच मीणा यांनी आरपीएफ जवानांसह एमसीओ गेटकडे धाव घेतली. यावेळी हा बालक पार्किंग परिसरात रडत उभा असलेला दिसला.
त्याला निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्यासमोर हजर करण्यात आले. तेथे कागदोपत्री कारवाईनंतर या बालकाला त्याच्या आजोबांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योतिकुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.