अग्निवीरांच्या भरतीसाठी नागपूर सज्ज; १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ पासून भरती प्रक्रियेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2022 01:55 PM2022-09-13T13:55:18+5:302022-09-13T14:02:31+5:30
मानकापूर स्टेडियमवर सर्व सुविधा उपलब्ध
नागपूर : विदर्भात तब्बल ५९,९११ ‘अग्निवीर’ म्हणजेच सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांनी नोंदणी केली आहे. या अग्निवीरांची भरती प्रक्रिया नागपुरात १७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून सुरू होत आहे. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरात ७ ऑक्टोबरपर्यंत जिल्हानिहाय ही भरती प्रक्रिया चालेल. यासाठी स्टेडियमवर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
विदर्भातील दहा जिल्ह्यांतील उमेदवारांची भरती नागपुरात होत आहे. सैन्याच्या नियमानुसार रात्री १२ ते सकाळपर्यंत ही भरती चालेल. त्यामुळे वाहतुकीचा त्रास होणार नाही. भरतीसाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे. उमेदवारांना मानकापूर स्टेडियमवर ये-जा करता यावी, यासाठी शासकीय शुल्कासह बससेवेचीही सुविधा उपलब्ध राहील. वैद्यकीय सुविधासह उत्तीर्ण उमेदवारांसाठी भोजनाचीही सुविधा राहील. उमेदवारांना सैन्यात नोकरी लावून देण्याचे कुणी आमीष दाखवत असेल तर अशांपासून सावध राहा, त्याची तक्रार करा, तातडीने गुन्हा दाखल केला जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अशी होईल जिल्हानिहाय भरती
१७ व १८ सप्टेंबरला गोंदिया जिल्ह्यातील अग्निवीरांची भरती होईल. १९ सप्टेंबरला गडचिरोली व वर्धा, २० सप्टेंबर चंद्रपूर, २१ सप्टेंबर यवतमाळ, २२ सप्टेंबर भंडारा, २३ सप्टेंबर अकोला (अकोला तालुका सोडून सर्व तालुके) २४ सप्टेंबर अमरावती, (अमरावती, दर्यापूर सोडून सर्व तालुके), २६ सप्टेंबर अकोला व अमरावती, २७ सप्टेंबर वाशिम, २८ सप्टेंबर नागपूर (नागपूर शहर व तालुका सोडून सर्व तालुके), २९ वाशिम-नागपूर, ३० सप्टेंबर (सर्व जिल्हे), १ ऑक्टोबर नागपूर, अकोला व अमरावती सोडून सर्व जिल्हे, ३ ऑक्टोबर नागपूर, अकोला व अमरावती, ४ ऑक्टोबर सर्व जिल्हे, ५ ते ७ ऑक्टोबर वैद्यकीय चाचणी होईल.