कौशल्य विकास विभाग देणार आरोग्य प्रशिक्षण ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:04+5:302021-05-29T04:07:04+5:30
१ जूनपासून प्रशिक्षणाला सुरुवात लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार ...
१ जूनपासून प्रशिक्षणाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभाग बेरोजगार युवक-युवतींना आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण देणार असून यासाठी १ जूनपासून सुरूवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक प्रभाकर हरडे, विदर्भ हॉस्पिटल असोशिएनचे सचिव डॉ. अनुप मरार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे उपस्थित होते. वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची सध्या वाणवा आहे. कोविडमध्ये डॉक्टरांसोबतच नर्सेस,परिचारिका, तसेच पॅरामेडिकल स्टाफची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी व तिसऱ्या लाटेत प्रशिक्षित मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १ जूनपासून प्रशिक्षण सुरू होणार असून महास्वयम ॲपव्दारे रुग्णालयांना कोर्सनिहाय प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल.
अगदी ५ उमेदवारांसाठीसुध्दा प्रशिक्षण देता येईल. राज्य कौशल्य सोसायटी नोडल असणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ५५ अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहे. १०० ते १००० तासाचे प्रशिक्षण अभ्यासक्रमनिहाय उमेदवारांना देण्यात येईल. यासाठी उमेदवाराचे वय १५ ते ४५ दरम्यान असावे, तसेच सर्व उमेदवारांसाठी प्रशिक्षण नि:शुल्क आहे. हेल्थकेअर, मेडिकल, नर्सिग, वाहनचालक, रुग्णवाहिका चालक या अभ्यासक्रमाचाही यात समावेश आहे. वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रांशी संलग्नित मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा १९ मे २०२१ शासननिर्णय करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी इस्पितळे व २० बेडपेक्षा अधिक सुविधा असलेल्या खासगी इस्पितळांना /वैद्यकीय संस्थांना व्यावसायिक प्रशिक्षण संस्थाना ग्रीन चॅनेल म्हणून सूचीबध्द करण्यात येणार आहे. त्यांच्या आवश्यकतेनुसार हे खासगी इस्पितळ तरुणांना प्रशिक्षित करतील.
बॉक्स
सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन
कोविड व म्युकरमायकोसिसच्या आव्हानात्मक काळात वैद्यकीय क्षेत्राला प्रशिक्षित मनुष्यबळ पुरविण्याच्या दृष्टीने कौशल्य विकासचा हा प्रयत्न उत्तम असून याला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे मदत करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. तसेच खासगी इस्पितळांना प्रशिक्षणासाठी जागा नसल्यास ती उपलब्ध करून देण्याचे विदर्भ हॉस्पिटल असोशिएनचे सचिव डॉ. अनुप मरार यांनी आश्वस्त केले. तर प्रशिक्षित मनुष्यबळासाठी आयएमएचे सहकार्य राहण्याची ग्वाही आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे यांनी यावेळी दिली.