लॉकडाऊनच्या वेळात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:44 PM2020-05-18T19:44:50+5:302020-05-18T19:47:08+5:30
कोरोनाच्या संकटात रोजगार गमावण्याचे दु:ख व भविष्याबाबत अनिश्चिततेची जाणीव यामुळे कष्टकरी वर्ग प्रचंड तणावात आहे. त्यांना नैराश्यातून काढणे आणि त्यांनी स्वत: रोजगाराची संधी निर्माण करावी, यासाठी महापालिकेच्या निवारा केंद्रात विविध विषयांवर कौशल्ये व तंत्र विकासाचे प्रशिक्षण तज्ज्ञाकडून देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या संकटात रोजगार गमावण्याचे दु:ख व भविष्याबाबत अनिश्चिततेची जाणीव यामुळे कष्टकरी वर्ग प्रचंड तणावात आहे. त्यांना नैराश्यातून काढणे आणि त्यांनी स्वत: रोजगाराची संधी निर्माण करावी, यासाठी महापालिकेच्या निवारा केंद्रात विविध विषयांवर कौशल्ये व तंत्र विकासाचे प्रशिक्षण तज्ज्ञाकडून देण्यात आले.
लॉकडाऊन दरम्यान विविध राज्यातील स्थलांतरित मजूर नागपुरात अडकलेत. त्यांना महापालिकेने उभारलेल्या निवारागृहात ठेवण्यात आले. याशिवाय शहरातील बेघर लोकांना देखील मनपाने या संकटसमयी आश्रय दिला. यावेळी त्यांना मानसिक आधार मिळण्यासह भविष्यात त्यांनी रोजगाराचे साधन निर्माण करावे यासाठी विविध संघटनांच्या मदतीने कौशल्य विकासाचे प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. या संघटनांनी निवारागृहातील लोकांचे सकारात्मक समुपदेशन तर केलेच पण सोबत उद्योजकता व कौशल्य विकासाचे, तंत्राचे सोप्या भाषेत प्रशिक्षण देखील दिले. या कौशल्याचा उपयोग अर्थार्जन व रोजगार निर्मिती साठी करू अशी हमीदेखील सहभागी लोकांनी दिली. या कौशल्य विकास कार्यक्रमात पावसाच्या पाण्याचे नियोजन, औषधी व इतर उपयोगी रोपांची नर्सरी, पाणी व मृदा संवर्धन, बांधकाम क्षेत्रातील नवीन संधी व रद्दी पेपरपासून घरबसल्या उपयोगी लिफाफे व इतर वस्तू बनवण्याची माहिती व प्रशिक्षण देण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकारणाचे सचिव न्या. अभिजीत देशमुख यांनी निवारागृहाला भेट देऊन कौशल्य विकास उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमात मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सिटी मिशन मॅनेजर विनय त्रिलोकीवार तसेच इंटरनॅशनल स्किल डेव्हलपमेंट सोसायटीचे अर्शद तन्वीर खान, ईकॉन्सस फाऊंडेशनचे डॉ. समीर देशपांडे व डॉ. मुनमून सिन्हा, समीर पटेल, आपुलकी सामाजिक संस्थेचे अमिताभ पावडे, मुद्रास चॅरिटेबल सोसायटीच्या रूपम झा देवांगण, प्रभात धारीवाल, पवन गजभिये व मनपाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग व सहकार्य लाभले.