विद्यार्थ्यांच्या कौशल्याला सरावाची जोड हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:29 AM2017-09-06T01:29:30+5:302017-09-06T01:30:19+5:30

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनविणे अत्यावश्यक झाले. केवळ पदवी प्रदान न करता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्याचे ज्ञान दिले पाहिजे.

The skill of the students should be linked to the practice | विद्यार्थ्यांच्या कौशल्याला सरावाची जोड हवी

विद्यार्थ्यांच्या कौशल्याला सरावाची जोड हवी

Next
ठळक मुद्देविकास महात्मे : नागपूर विद्यापीठातर्फे उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण बनविणे अत्यावश्यक झाले. केवळ पदवी प्रदान न करता विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना कौशल्याचे ज्ञान दिले पाहिजे. कौशल्यात विद्यार्थी मागे पडू नये यासाठी त्याला सरावाची जोड देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे मत सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ व खासदार डॉ. विकास महात्मे यांनी व्यक्त केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे मंगळवारी उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
गुरुनानक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे होते; सोबतच प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव पूरण मेश्राम हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमात उत्कृष्ट शिक्षक, प्राचार्य, संशोधन, लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ. महात्मे यांनी कार्यक्रमादरम्यान उपस्थितांसमोर ‘पॉवर पॉर्इंट’ सादरीकरण करीत आपले मुद्दे मांडले. बदलत्या शिक्षण व्यवस्थेत शिक्षणाचा विस्तार झाला, मात्र त्याला कौशल्याची जोड हवी तशी मिळालेली नाही. त्यामुळे पदवी घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी प्रत्यक्ष काम करताना चांगले प्रदर्शन करेल, असे होत नाही. शिक्षण काळातच विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यमापन होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना नेमके शिकविल्यापैकी काय समजले याची पडताळणी शिक्षकांनी करायला हवी. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागरूक करण्यासोबत विचार करण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. विद्यार्थ्यांनीदेखील स्वत:ची जबाबदारी ओळखून जास्तीत जास्त ज्ञान ग्रहण करण्यावर भर ठेवला पाहिजे, असा सल्ला डॉ. महात्मे यांनी दिला. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण पद्धतीतूनच आपण समृद्ध व समाजाभिमुख भावी पिढी घडवू शकू, असेदेखील ते म्हणाले. डॉ. प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कोमल ठाकरे यांनी संचालन केले, तर पूरण मेश्राम यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मैत्रयी घनोटे हिने सिन्थेसायझरवर वाजविलेल्या राष्ट्रगीताच्या धूनने झाली.
गुरू बना, ‘बाबा’ नाही
यावेळी कुलगुरूंनीदेखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक बनावे, भोंदू ‘बाबा’ बनण्याचे काम त्यांनी करू नये. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सर्वार्थाने घडविले पाहिजे व त्याच्यात आत्मविश्वास जागृत केला पाहिजे, असे डॉ. काणे म्हणाले.
पुरस्काराचे मानकरी
उत्कृष्ट प्राचार्य : डॉ. राजेश पांडे, रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय

उत्कृष्ट शिक्षक : मेधा कानेटकर (सी.पी.अ‍ॅन्ड बेरार महाविद्यालय), डॉ. सुजाता देव (शासकीय विज्ञान संस्था), डॉ. ओमप्रकाश चिमणकर (भौतिकशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ), डॉ. किरण नागतोडे (स्वावलंबी शिक्षण महाविद्यालय), डॉ. यशवंत पाटील (मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस महाविद्यालय),
उत्कृष्ट संशोधक : डॉ. डी. एम. कोकरे (फार्मसी विभाग, नागपूर विद्यापीठ), डॉ. राजेश उगले , डॉ. शुभांगी रतकंठीवार (वायसीसीई), डॉ. कीर्तीकुमार रणदिवे

(भूगर्भशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ), डॉ. भारत
भानवासे (लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्था)
उत्कृष्ट शिक्षक(सामाजिक कार्यकर्ता): डॉ. उल्हास मोगलेवार (संत गाडगेबाबा महाविद्यालय), प्रा. भालचंद्र हरदास (रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय), डॉ. विलास घोडे (भय्यासाहेब पांढरीपांडे समाजकार्य महाविद्यालय)
उत्कृष्ट लेखक : डॉ. संजय जैन (प्रियदर्शिनी महाविद्यालय), वर्षा गंगणे (मनोहरभाई पटेल महाविद्यालय, देवरी), डॉ. गजानन पाटील (मनोहरराव कामडी महाविद्यालय)

Web Title: The skill of the students should be linked to the practice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.