नागपुरातील स्किन बँकेत २ रुग्णांना पुरेल एवढीच त्वचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:43 AM2019-06-11T10:43:12+5:302019-06-11T10:45:00+5:30
चार वर्षांपासून नागपुरात सुरू झालेल्या ‘स्किन बँके’त सद्यस्थितीत दोन रुग्णांना पुरेल एवढीच म्हणजे ‘तीन हजार स्क्वेअर सेंटीमीटर’त्वचा शिल्लक आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गंभीर स्वरूपाच्या जळीत रुग्णांना त्वचा प्रत्यारोपणाने (होमोग्राफ्टिंग) वाचविणे शक्य असले तरी आपल्या समाजात त्वचादानाचे महत्त्व जनमानसात फारसे रुजलेले नाही. परिणामी, अनेकांवर जीव गमावण्याची वेळ येते. विशेष म्हणजे, चार वर्षांपासून नागपुरात सुरू झालेल्या ‘स्किन बँके’त सद्यस्थितीत दोन रुग्णांना पुरेल एवढीच म्हणजे ‘तीन हजार स्क्वेअर सेंटीमीटर’त्वचा शिल्लक आहे. यातून समाजात त्वचादानाबाबत असलेली उदासीनता समोर आली आहे.
जळितांच्या घटनांमधून येणारे अपंगत्व, विद्रुपपणा यामुळे जळीत रुग्णांमधील आत्मविश्वास घटण्याचे प्रमाण मोठे आहे. या घटना घडल्यानंतर पुन्हा मानसिकदृष्ट्या पूर्ववत होण्यास बराच काळ जातो. या प्रकारांना आळा घालण्यासाठी व गंभीर स्वरूपाच्या जळीत रुग्णांना त्वचा प्रत्यारोपणाने (होमोग्राफ्टिंग) वाचविण्यासाठी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. समीर जहागीरदार यांच्या सहकार्याने व रोटरी क्लब, आॅरेंज सिटी हॉस्पिटल आणि नॅशनल बर्न सेंटर मुंबईच्या पुढाकारामुळे नागपुरात २७ फेब्रुवारी २०१४ मध्ये पहिली त्वचा बँक सुरू झाली. परंतु भारतात नेत्रदान, अवयवदान तसेच त्वचादानाबाबत उदासीनता आहे. मृत्यूनंतर सहज देता येणाऱ्या त्वचादानाला घेऊन अनेक गैरसमजुती आहेत. परिणामी, चार वर्षांत केवळ ३६ दात्यांकडून त्वचा दान झाले. सद्यस्थितीत साधारण ‘तीन हजार स्क्वेअर सेंटीमीटर’ एवढीच त्वचा बँकेत आहे.
अशी आहे त्वचादानाची प्रक्रिया
नैसर्गिक, अपघाती, मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्ती त्वचादान करू शकतात.
मृत्यूनंतरच्या सहा तासांमध्येच त्वचादान होणे अत्यावश्यक आहे.
‘स्किन बँके’ची टीम मृताच्या घरी येऊन त्वचादान स्वीकारते
मृतदेहाच्या कुठल्याही विकृतीशिवाय ३० मिनिटांत त्वचादान होते.
त्वचादात्याची पूर्ण स्किन काढली जात नाही, केवळ एक अष्टमांश त्वचा काढली जाते. यामुळे मृत व्यक्ती विद्रूप दिसत नाही.
कमीत कमी १८ वर्षांवरील मृत व्यक्तीकडून त्वचा घेतली जाते.
दात्यांचा रक्तगट, वय किंवा मधुमेह, रक्तदाबासारखे आजार अडसर ठरत नाही
दान त्वचेवर प्रक्रिया केल्यानंतर पाच वर्षे त्वचा जतन करणे शक्य आहे.
एड्सग्रस्त, एचआयव्ही पॉझिटिव्ह, कावीळ पॉझिटिव्ह व्यक्तींचे त्वचादान स्वीकारले जात नाही
त्वचाविकार, लैंगिक आजारग्रस्तांची त्वचा घेतली जात नाही.
त्वचेची विविध चाचणी व प्रक्रिया केल्यानंतर २१ दिवसानंतर गरजू रुग्णामध्ये त्वचारोपण केले जाते.
चार वर्षांत ४० रुग्णांना जीवनदान
डॉ. जहागीरदार म्हणाले, नागपुरातील पहिल्या त्वचा बँकेत आतापर्यंत साधारण ३६ दात्यांकडून त्वचा दान करण्यात आली आहे. यातून ४० रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. यातील बहुसंख्य रुग्ण जळीत प्रकरणांशी संबंधित होते.
पाच महिन्यांपासून त्वचा दान नाही
सहा महिन्यांपूर्वी साधारण २६ हजार स्क्वेअर सेंटीमीटर त्वचा बँकेत जमा होती. बँकेची मर्यादा संपल्याने दात्यांना नम्रपणे त्वचा दानास नकार द्यावा लागला. मात्र, सद्यस्थितीत दोन रुग्णांना पुरेल एवढीच बँकेत त्वचा आहे. पाच महिन्यांपासून दाता उपलब्ध झालेला नाही. यामुळे अधिकाधिक लोकांनी त्वचादानाचा विचार केला पाहिजे.
-डॉ. समीर जहागीरदार, त्वचारोग तज्ज्ञ