कर्णधार विराट कोहलीने टिपले ५० झेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:30 PM2017-11-23T23:30:03+5:302017-11-23T23:32:35+5:30
श्रीलंकेविरुद्ध व्हीसीए जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी गुरुवारी कसून सराव केला.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : श्रीलंकेविरुद्ध व्हीसीए जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंनी गुरुवारी कसून सराव केला. कर्णधार विराट कोहलीसह स्पेशालिस्ट सलामीवीर मुरली विजय, के.एल. राहुल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, यष्टिरक्षक रिद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी फलंदाजीचा सराव केला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी भारतीय संघाचे सराव सत्र झाले. फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांनी फलंदाजांना आखूड टप्प्याच्या चेंडूवर सराव दिला तर रवी शास्त्री विशेषता मुरली विजयच्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करून असल्याचे दिसले. सरावसत्रादरम्यान रवी शास्त्री व विराट कोहली बराच वेळ चर्चा करीत असल्याचे दिसले. सर्वांची नजर स्थानिक खेळाडू व ‘विदर्भ एक्स्प्रेस’नावाने ओळखल्या जाणाऱ्या उमेश यादववर होती. त्याने बराच वेळ गोलंदाजी केली. उमेशपूर्वी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी सराव केला. नेटव्यतिरिक्त शमीने मैदानावरील प्रॅक्टिस पिचवर गोलंदाजीचा सराव केला. स्थानिक गोलंदाजांनाही या सराव सत्रात सहभागी करून घेण्यात आले होते. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवही गोलंदाजीचा सराव करताना दिसला. आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने गोलंदाजीचा सराव केला, पण जडेजाने केवळ फलंदाजीचा सराव केला. तामिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकर सराव सत्रात सहभागी झाला होता, पण त्याने काहीवेळ फलंदाजी व गोलंदाजी केली. बराचवेळ तो नेटच्या बाहेर होता, पण क्षेत्ररक्षणाच्या सरावाच्या वेळी मात्र तो बराचवेळ कर्णधार कोहलीसोबत होता. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक श्रीधरने कोहली, शंकर यांना उंचीवरच्या झेलचा सराव दिला तर चेतेश्वर पुजाराला फलंदाजाच्या जवळच्या क्षेत्ररक्षणाचा सराव दिला.