नागपुरात स्लॅब अंगावर कोसळल्याने मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 09:22 PM2018-03-27T21:22:56+5:302018-03-27T21:23:08+5:30
सुरक्षेच्या उपाययोजना न करता धोक्याच्या ठिकाणी मजुराला कामाला लावल्यानेच त्याचा जीव गेल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुरक्षेच्या उपाययोजना न करता धोक्याच्या ठिकाणी मजुराला कामाला लावल्यानेच त्याचा जीव गेल्याचा अंदाज बांधून पोलिसांनी इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली होती.
कडबी चौक, बेझनबागमधील इमारतीच्या बांधकामस्थळी स्लॅब कोसळून शामराव महादेवराव हरडे (वय ४१, रा. पार्वतीनगर, रामेश्वरी) या मजुराचा करुण अंत झाला होता. तर, विनोद राऊत नामक तरुण गंभीर जखमी झाला आहे.
सॅमसंगच्या शोरूमसमोर असलेली ही इमारत कनक विपीन अग्रवाल (रा. कल्पतरू कॉलनी) यांनी विकत घेतली आहे. सोमवारी तेथे हरडे, राऊत आणि अन्य मजूर दुसऱ्या माळ्यावर काम करीत होते. धोक्याचे काम सुरू असताना तेथे मजुरांच्या सुरक्षेसाठी कोणत्याही उपाययोजना नव्हत्या. तसेच तेथे सुरू असलेल्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर केला जात होता. त्यामुळे तेथे काही दिवसांपूर्वी घातलेल्या स्लॅबचा काही भाग मजुरांच्या अंगावर कोसळला आणि मलब्यात दबून मजूर जबर जखमी झाले. अन्य मजुरांनी धावपळ करून त्यांना बाहेर काढले. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे हरडेंचा मृत्यू झाला. तर, विनोद गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे. या प्रकाराची तक्रार श्यामराव यांचा भाऊ हरीश महादेवराव हरडे यांनी जरीपटका ठाण्यात नोंदवली. हरडेच्या मृत्यूला इमारतीचे मालक कनक अग्रवाल यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे उघड झाल्याने जरीपटका पोलिसांनी अग्रवालविरुद्ध कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.