निर्माणाधिन टाकीवरील स्लॅब काेसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:09 AM2021-05-21T04:09:36+5:302021-05-21T04:09:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुटीबाेरी : टंचाई काळात पाणी वापरायला मिळावे म्हणून पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुटीबाेरी : टंचाई काळात पाणी वापरायला मिळावे म्हणून पाणी साठवून ठेवण्यासाठी जमिनीत पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. त्या निर्माणाधिन टाकीवरील स्लॅब काेसळल्याची घटना बुटीबाेरीनजीकच्या बाेरखेडी (फाटक) येथे साेमवारी (दि. १७) घडली. यात प्राणहानी झाली नसली तरी, हे बांधकाम निकृष्ट प्रतीचे असल्याचा आराेप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
बोरखेडी (फाटक) या गावाचा समावेश बाेथली (ता. नागपूर ग्रामीण) गट ग्रामपंचायतअंतर्गत करण्यात आला आहे. येथे नेहमीच पाणीटंचाई जाणवत असल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही भटकंती थांबविण्यासाठी तसेच टंचाई काळात पाणी मिळावे म्हणून बाेरखेडी (फाटक) येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम मंजूर करण्यात आले. त्यात एमआयडीसीकडून मिळणारे पाणी साठविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. ही टाकी जमिनीत बांधण्यात आली असून, तिचा काही भाग जमिनीवर आहे. त्यावर सेंट्रिंग बांधून स्लॅब टाकण्यात आला. मात्र, सेंट्रिंग व्यवस्थित न लावल्याने स्लॅब काेसळला. या टाकीचे बांधकाम विनानिविदा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत कंत्राटदारास विचारणा केली असता, कामाचे प्राकलन कनिष्ठ अभियंत्यास मागा, अशी सूचना कंत्राटदाराने केली. आपण कनिष्ठ अभियंत्याच्या सूचनेनुसार काम करीत असल्याचे त्याने स्पष्ट केले. या टाकीचे बांधकाम निकृष्ट प्रतीचे सुरू असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे केल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली असून, प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही, असा आराेपही त्यांनी केला. अधिकारी व कंत्राटदार यांच्यातील हितसंबंधांमुळे ही कामे निकृष्ट प्रतीची केली जात असल्याचा आराेपही काहींनी केला.
....
दीड लाख लिटर क्षमता
या टाकीची पाणी साठवण क्षमता ही १ लाख ५० हजार लिटरची आहे. या टाकीच्या बांधकामासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने १५ वा वित्त आयाेगातून ११ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला हाेता. त्यामुळे ३० जानेवारी २०२१ राेजी या टाकीचे भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात करण्यात आली. अवघ्या चार महिन्यात या कामाचा निकृष्टपणा उघड झाल्याचा आराेप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे, ‘तुम्ही लेखी तक्रार करा, आम्ही कारवाई करू’, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता हेमके यांनी व्यक्त केली.
...
===Photopath===
200521\img_20210518_174512.jpg
===Caption===
निर्माणाधिन पिण्याच्या पाण्याच्या संपाच्या (पाण्याची टाकी) वरील स्लॅब कोसळला