झोपेची शिक्षा, १० दिवसांचा तुरुंगवास
By admin | Published: May 6, 2014 07:14 PM2014-05-06T19:14:36+5:302014-05-06T19:29:36+5:30
रेल्वेस्थानकावर झोप घेणे सहा जणांच्या चांगलेच अंगलट आले. रेल्वे सुरक्षा दलाने त्यांच्यावर कारवाई करून रेल्वे न्यायालयासमोर हजर केले.
नागपूर : रेल्वेस्थानकावर झोप घेणे सहा जणांच्या चांगलेच अंगलट आले. रेल्वे सुरक्षा दलाने त्यांच्यावर कारवाई करून रेल्वे न्यायालयासमोर हजर केले. याशिवाय अपंगांसाठी राखीव असलेल्या कोचमधून प्रवास करणार्या नऊ जणांनाही ताब्यात घेतले. रेल्वे स्थानकात कुठलेही तिकीट न घेता प्रवेश करणे कायद्यानुसार गुन्हा आहे. असेच सहा प्रवासी जवळ कुठलेही तिकीट न बाळगता प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या बाकड्यांवर झोपी गेले. मंगळवारी रेल्वे सुरक्षा दलाने त्यांच्या विरुद्ध रेल्वे ॲक्ट १४७ नुसार अटक करून त्यांना रेल्वे न्यायालयासमोर हजर केले. रेल्वे न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. चार जणांनी दंड भरून सुटका करून घेतली. दोघांजवळ पैसे नसल्यामुळे त्यांना प्रत्येकी १० दिवसाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय अपंगांसाठी राखीव कोचमधून प्रवास करणार्या नऊ जणांनाही रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध रेल्वे ॲक्ट १५५ नुसार गुन्हा दाखल केला. त्यांनाही रेल्वे न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपये दंड सुनावला. (प्रतिनिधी)