पालथे झोपा अन्‌ रक्तातील ऑक्सिजन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:07 AM2021-05-07T04:07:54+5:302021-05-07T04:07:54+5:30

नागपूर : एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांवर (फुफ्फुस) आणि श्वसन प्रणालीवर थेट हल्ला करतो. यामुळे व्यक्तीच्या रक्ताच्या ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम ...

Sleep well and increase oxygen in the blood | पालथे झोपा अन्‌ रक्तातील ऑक्सिजन वाढवा

पालथे झोपा अन्‌ रक्तातील ऑक्सिजन वाढवा

Next

नागपूर : एखाद्या व्यक्तीच्या फुफ्फुसांवर (फुफ्फुस) आणि श्वसन प्रणालीवर थेट हल्ला करतो. यामुळे व्यक्तीच्या रक्ताच्या ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. ज्यामुळे त्याला श्वास घेणे कठीण होते. अशा परिस्थितीत रक्तामध्ये ऑक्सिजनची पातळी राखणे ही पहिली गरज असते. अशावेळी कृत्रिम ऑक्सिजनची कुठलीही सोय नसल्यास रुग्णवाहिका येईपर्यंत पालथे झोपा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. पालथे झोपल्यास ऑक्सिजनचे प्रमाण वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

नागपूर जिल्ह्यात सध्याच्या स्थितीत १२,६९८ रुग्ण विविध शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर, ५६,५०१ रुग्ण गृहविलगीकरणात म्हणजे, होम आयसोलेशनमध्ये आहेत. रक्ताचे सामान्य प्रमाण साधारणत: ९७ टक्के असते. हे प्रमाण ९० टक्क्यांपेक्षा कमी गेल्यास मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, तर ८० टक्के ऑक्सिजन पुरवठा झाल्यास शरीरातील मुख्य अवयव जसे फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड इत्यादी बिघडण्याची शक्यता वाढते. यामुळे डॉक्टर गृहविलगीकरणातील रुग्णांना सहा मिनिटे आपल्या खोलीत चालून पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्यास सांगतात. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ९४ च्या खाली आल्यास तातडीने हॉस्पिटल गाठण्याचा सल्ला देतात. रुग्णवाहिका येईपर्यंत किंवा इतर सोयी उपलब्ध होईपर्यंत पालथे झोपून राहण्याचाही सल्ला देतात.

-पालथे झोपल्याने हा फायदा होतो

मेयोच्या श्वसनरोग विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. राधा मुंजे म्हणाल्या, ‘‘आपल्या फुफ्फुसात ‘एअर पॉकेट’ असतात. आपल्या रोजच्या श्वासोच्छवासात सगळेच्या सगळे उडतात व काम करीत असतात असे नाही. कोविडमध्ये जेव्हा ऑक्सिजन कमी पडायला लागते. तेव्हा हे ‘एअर पॉकेट’ म्हणजे ‘अ‍ॅलबीलाय’ उघडणे व सगळीकडे हवा जाणे गरजेचे ठरते; पण जेव्हा पाठीच्या भारावर आपण झोपलेलो असतो तेव्हा वरच्या भागात हवा जाते, खालच्या भागात हवा जात नाही. अशावेळी पोटाच्या भारावर झोपल्यास खालच्या भागात हवा जाते. यामुळे जिथे आतापर्यंत हवा जात नव्हती व ऑक्सिजनेशनमध्ये मदत होत नव्हती ती मदत करायला लागते. यामुळे ऑक्सिजनचे प्रमाण वाढायला लागते. कोरोनाबाधित गर्भवती महिलांना पोटाच्या भारावर झोपता येणार नाही. त्यांनी झोपताना कुस बदलत रहायला हवी.’’

-दर अर्ध्या ते दोन तासापर्यंत कूस बदलत रहायला हवे

मेयोच्या श्वसनरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानचंद मिश्रा म्हणाले, ‘‘कोरोनामुळे आपल्या फुफ्फुसातील हवा आत बाहेर सोडणारे ‘अ‍ॅलबीलाय’ सुजलेले असतात. यामुळे यातील ‘गॅस एक्सचेंज’ प्रभावित होतात. परिणामी, शरीरातील ऑक्सिजनवर याचा परिणाम होतो. म्हणून हॉस्पिटलमध्ये असलेल्या किंवा गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना प्रत्येकी अर्ध्या ते दोन तासापर्यंत पोटाच्या भारावर, पाठीच्या भारावर, उजव्या कुशीवर, डाव्या कुशीवर व बसून राहण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ‘अ‍ॅलबीलाय’ उघडून ऑक्सिजन पातळी वाढण्यास मदत होते.’’

जिल्ह्यातील एकूण रुग्ण: ४,२८,५३९

रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण: १२,६९८

गृहविलगीकरणातील रुग्ण: ५६,५०१

Web Title: Sleep well and increase oxygen in the blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.