‘गजवा-ए-हिंद’च्या ‘मॉड्युल’चे ‘स्लीपर सेल’ नागपुरात?

By योगेश पांडे | Published: March 24, 2023 07:30 AM2023-03-24T07:30:00+5:302023-03-24T07:30:02+5:30

Nagpur News दहशतवाद्यांच्या नेहमीच ‘टार्गेट’वर असलेल्या नागपूरमध्ये ‘एनआयए’ने केलेल्या छापेमारीनंतर खळबळ उडाली आहे. ‘गजवा-ए-हिंद’च्या ‘मॉड्युल’चा उपयोग करून नागपुरात विखारी विचारांचे ‘स्लीपर सेल’ तयार करण्यावर भर होता, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे.

'Sleeper cell' of 'module' of 'Gajwa-e-Hind' in Nagpur? | ‘गजवा-ए-हिंद’च्या ‘मॉड्युल’चे ‘स्लीपर सेल’ नागपुरात?

‘गजवा-ए-हिंद’च्या ‘मॉड्युल’चे ‘स्लीपर सेल’ नागपुरात?

googlenewsNext

योगेश पांडे

नागपूर : दहशतवाद्यांच्या नेहमीच ‘टार्गेट’वर असलेल्या नागपूरमध्ये ‘एनआयए’ने केलेल्या छापेमारीनंतर खळबळ उडाली आहे. ‘गजवा-ए-हिंद’च्या ‘मॉड्युल’चा उपयोग करून नागपुरात विखारी विचारांचे ‘स्लीपर सेल’ तयार करण्यावर भर होता, असा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे. त्यासंदर्भात गुरुवारी चौघांचीही झाडाझडती घेण्यात आली. या ‘मॉड्युल’मध्ये नागपूर ‘लिंक’ मिळाल्यामुळे सुरक्षा यंत्रणांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

‘गझवा-ए-हिंद’चे प्रकरण जुलै २०२२ मध्ये समोर आले होते. बिहारमधील पटना जिल्ह्यातील फुलवारीशरीफ येथे या मॉड्युलमधील सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे मॉड्युल पाकिस्तानमधून नियंत्रित होत होते. संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपचा ॲडमिन मरघुब अहमद दानिश याला अटक करण्यात आली होती. त्याने सोशल माध्यमांच्या विविध प्लॅटफॉर्म्सवर ‘गझवा-ए-हिंद’ नावाने ग्रुप्स तयार केले होते. मरघुबने त्यात पाकिस्तानसह येमेन, बांगलादेश व भारतातील तरुणांना सदस्य बनविले होते. देशविरोधी कृत्य आणि धार्मिक कट्टरता पसरवण्यासाठी यात तरुणांचे ब्रेनवॉशिंग करण्यात येत होते. याच प्रकरणाची ‘लिंक’ नागपुरातदेखील आढळून आली. मघरुब हा दहशतवादी कारवायांसाठी स्लीपर सेल तयार करत होता, असा खुलासा चौकशीदरम्यान झाला होता. मघरुब सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांपर्यंत भडकावू व उन्मादी मजकुराचा प्रचार-प्रसार करायचा. या माध्यमांतून भारताविरोधात अंतर्गतच आव्हान उभे करायचे व हिंसक कारवाया घडवून आणण्याचे षडयंत्र होते. तरुणांचे ‘ब्रेनवॉशिंग’ झाले की त्यांना ‘स्लीपर सेल’ म्हणून तयार करण्यावर त्याचा भर असायचा. यासाठी त्याचे इतर सहकारीदेखील कार्यरत होते.

नागपुरात या ‘मॉड्युल’चा उपयोग करून ‘स्लीपर सेल’ तयार करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सुरक्षा यंत्रणांतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ताब्यात असलेल्यांच्या चौकशीतून नागपूर ‘कनेक्शन’ समोर आले व त्यातून गुरुवारची कारवाई झाली. मात्र, यातील मुस्तफा याच्यावर सुरक्षा यंत्रणांना जास्त संशय होता. त्याची कसून चौकशी करण्यात आली व त्याच्याकडून आणखी काही ‘लिंक्स’ मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘स्लीपर सेल’ शोधणे आव्हानात्मक

या ‘मॉड्युल’मध्ये केवळ फुलवारीशरीफ येथूनच सोशल माध्यमांना नियंत्रित करण्यात येत नव्हते. तर इतरही ठिकाणी सक्रिय सदस्य बसले होते. त्यामुळे इतर ठिकाणांवरूनदेखील नागपुरात ‘स्लीपर सेल’ तयार करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘स्लीपर सेल्स’ला समोरून सूचना आल्यानंतरच ते सक्रिय होतात. मात्र, पीएफआयवरील कारवाया व त्यानंतर ‘एनआयए’च्या विविध ठिकाणी झालेल्या छापेमारीनंतर ‘मॉड्युल’चे म्होरके ‘आऊट ऑफ रिच’ झाल्याची शक्यता आहे. अशास्थितीत ‘स्लीपर सेल’ शोधणे ही फार कठीण बाब असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

Web Title: 'Sleeper cell' of 'module' of 'Gajwa-e-Hind' in Nagpur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.