स्मार्टफोनने उडवली झोप : राजेश स्वर्णकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:11 PM2019-10-10T22:11:26+5:302019-10-10T22:18:25+5:30
झोपण्यापूर्वी लॅपटॉप, टॅब्लेट्स, स्मार्टफोन व ई-बुकचा वापर वाढला आहे. परिणामी, जगात ४५ टक्के लोकांना झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोपण्यापूर्वी लॅपटॉप, टॅब्लेट्स, स्मार्टफोन व ई-बुकचा वापर वाढला आहे. परिणामी, जगात ४५ टक्के लोकांना झोपेशी जुळलेल्या रोगाशी सामना करावा लागत आहे. चांगल्या आरोग्यासाठी झोप महत्त्वाची आहे. पुरेशी झाोप झााल्यास मानसिक आजारासह मधुमेह, रक्तदाबासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो, अशी माहिती पल्मोनोलॉजिस्ट डॉ. राजेश स्वर्णकार यांनी पत्रपरिषदेत दिली.
चिटणवीस सेंटर येथे १२ ऑक्टोबरपासून अपुरी झोप आणि आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची कारणमीमांसा करण्यासाठी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हे निमित्त साधून डॉ. स्वर्णकार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इंटरव्हेन्शनल पल्मोनोलॉजिस्ट डॉ. दीपक मुथरेजा व ज्येष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अनिल सोनटक्के उपस्थित होते. डॉ. स्वर्णकार म्हणाले, प्रौढांसाठी सात ते आठ तासापर्यंतची झोप पुरेशी आहे. त्यानंतर जबरदस्ती झोपण्याचा प्रयत्न करू नये. जेवणानंतर कॅफिनयुक्त पेय घेऊ नये. झोपण्यापूर्वी दारूचे सेवन करू नये. सायंकाळनंतर धूम्रपान किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या निकोटिनचे सेवन करू नये. भारतात रस्ता अपघातासाठी निद्रानाश हेही एक कारण आहे.
परिषदेचे आयोजन सचिव डॉ. स्वर्णकार म्हणाले, दोन दिवस चालणाऱ्या या परिषदेत झोप आणि सकारात्मकता यावर डॉ. दीपक मुथरेजा माहिती देणार आहेत. झोपेमुळे होणाऱ्या दुष्परिणामावर ऑस्ट्रेलिया येथील डॉ. डेव्हिड कनिंग्टन, डॉ. केव्हिन काप्लान व्याख्यान देतील. अपुरी तसेच झोपेत वारंवार खंड पडल्याने होणाºया विविध प्रकारच्या व्याधींवर डॉ. हिमांशु गर्ग व डॉ. प्रतिभा डोग्रा मार्गदर्शन करतील. याशिवाय अमेरिका, लंडन, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया व श्रीलंका या देशातील स्लीप मेडिसीन या विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.
अपूऱ्या झोपेमुळे मानसिक व्याधी
डॉ. स्वर्णकार म्हणाले, अपूर्ण किंवा कमी दर्जाच्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक व्याधी जडतात़ ‘स्लिप अॅपनिया’ नावाचा आजार जागतिक स्तरावर ४ टक्के वयस्क व्यक्तींमध्ये आढळतो़ त्याचप्रमाणे झोपेचा ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ नावाचा आजार १० टक्के लोकांमध्ये आढळतो़ उशिरा झाोपणारे किंवा रात्रपाळीत काम करण्याऱ्या व्यक्तींमध्ये गंभींर स्वरूपाचे आजार होण्याची शक्यता अधिक असते. रात्री झोपेत घोरणे हा ‘स्लिप अॅपनिया’ या गंभीर आजाराचे लक्षण आहे. यामुळे झाोपेच्या ‘सायकलमध्ये’ अडथळा निर्माण होऊन शारीरिक व मानसीक स्वरूपाचे गंभीर आजार होतात.