थरारक! पिल्लाला वाचविण्यासाठी अस्वलीणीने दिली वाघाशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 03:56 PM2018-03-13T15:56:53+5:302018-03-13T15:56:53+5:30
या वाघाला अस्वलीणीच्या पिल्लाची शिकार करायची होती.
मुंबई: सध्या सोशल मीडियावर ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील वाघ आणि अस्वलाच्या थरारक झुंजीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. गेल्या आठवड्यात ताडोबात हा प्रकार घडला होता. येथील वनाधिकारी अक्षय कुमार यांनी हा संपूर्ण थरार आपल्या कॅमेऱ्यात टिपला.
या व्हिडिओच्या सुरुवातीला एक वाघ अस्वलाच्या मागे धावताना दिसत आहे. अक्षय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार या वाघाचे नाव मटकासूर आहे. येथील जामून बोडी परिसरात या वाघाचे वास्तव्य असते. याच ठिकाणी असणाऱ्या एका पाणवठ्यावर एक अस्वलीण आपल्या पिल्लाला घेऊन पाणी पिण्यासाठी आली होती. त्यावेळी वाघाने त्यांचा पाठलाग सुरू केला.
या वाघाला अस्वलीणीच्या पिल्लाची शिकार करायची होती. त्यामुळे वाघ त्यांच्यावर हल्ला करायची संधी शोधत होता. काही अंतरावर गेल्यानंतर या अस्वलीणीला पिल्लाला वाचवण्यासाठी वाघाशी लढण्यावाचून गत्यंतर नाही, हे लक्षात आले. त्यामुळे या अस्वलीणीने अचानकपणे उलटून वाघावर हल्ला केला. या सगळ्या प्रकारामुळे घाबरलेले अस्वलाचे पिल्लू जोरात ओरडायला लागले. मात्र, काही केल्या वाघ या दोघांना सोडायला तयार नव्हता. मात्र, ही अस्वलीण आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा न करता वाघाशी झुंज देत राहिली. काही काळासाठी वाघ या अस्वलीणीला ठार मारून टाकेल, असे वाटत होते. मात्र, अस्वलीणीने आपल्या पिल्लाच्या रक्षणासाठी शेवटपर्यंत हार मानली नाही. तब्बल 15 मिनिटे ही भीषण झुंज सुरू होती. यामध्ये वाघ आणि अस्वलीणीने एकमेकांना अनेक जखमाही केल्या. शेवटी अस्वलीण आणखीनच आक्रमक झाली. अखेर तिच्या आक्रमक पवित्र्यापुढे वाघाने माघार घेतली आणि त्याने तेथून पळ काढला. या सगळ्या दरम्यान अस्वलीणीच्या पिल्लाने तेथून पळ काढण्यात यश मिळवले. त्यामुळे त्याचा जीव वाचू शकला.