पावसाची संथ चाल, गेल्यावर्षीच्या तुलनेत जलाशयांतही २० टक्के कमी जलसाठा
By कमलेश वानखेडे | Published: July 18, 2023 02:51 PM2023-07-18T14:51:50+5:302023-07-18T14:53:40+5:30
तोतलाडोह ७० टक्के तर कामठी खैरी जलाशय ६९ टक्केच साठा
नागपूर : मान्सूनचे आगमन उशीरा झाले. त्यानंतरही पावसाची चाल संथ राहिला. याचा परिणाम पूर्व विदर्भातील जलाशयांच्या जलसाठ्यावर झाला आहे. पूर्व विदर्भातील मोठ्या जलाशयांमध्ये ३३ टक्केच जलसाठा आहे. गेल्यावर्षीच्या आजच्या दिवसाची तुलना केली असता जलसाठा २० टक्क्यांनी कमीच आहे. पुढील दिवसात पावसाने दमदार हजेरी लावली नाही तर या जलाशयांचे पाणी उन्हाळ्यापर्यंत पुरणे कठीण जाणार आहे.
नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह प्रकल्पात ७०८ दलघमी म्हणजे सुमारे ७० टक्के जलसाठा आहे. गेल्यावर्षी याच तारखेला जलसाठा ८० टक्क्यांवर होता. कामठी खैरी जलाशयातही ७० टक्के साठा आहे.रामटेक खिंडसीमध्ये ६६ टक्के तर नांद व वणा मध्ये सुमारे ४० टक्केच जलसाठा आहे. गोंदिया जिल्ह्यातील इडियाडोह ५८ टक्के तर पुजारी टोला फक्त ३३ टक्के भरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ईरई धरणही ३२ टक्केच भरले आहे. वर्धा जिल्ह्यातील बोर व लोवर वर्धा -१ हे दोन्ही प्रकल्प अजूनही ५० टक्क्यांखालीच आहेत.
दिना, असोलामेंढा फुल्ल
- गडचिरोली जिल्ह्यातील दिना प्रकल्प (६७.५७ दलघमी) व चंद्रपूर जिल्ह्यातील असोलामेंढा (५२.३३ दलघमी) हे दोन्ही प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.
गोसीखुर्द प्रकल्प ३६ टक्केच भरला
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पही फक्त ३६ टक्केच भरला आहे. या प्रकल्पात सध्यस्थितीत २६२.४६१ दलघमी साठा आहे. बावनथडी प्रकल्पाही ३१ टक्केच भरला आहे.
धरणक्षेत्रात निम्माच पाऊस
- तोतलाडोह, कामठी खैरी व रामटेक खिंडसी या जलाशयांच्या क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्माच पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी १८ जुलैपर्यंत तोतलाडोह धरणक्षेत्रात ६९५ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी फक्त ३५१ मिमी पाऊस झाला आहे. कामठी खैरी जलाशयाच्या क्षेत्रात गेल्यावर्षी आजच्या तारखेपर्यंत ६८५ मिमी पाऊस झाला होता. यावर्षी आजवर फक्त २८७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जलाशय -आजचा साठा -मागील वर्षी (१८ जुलै)
तोतलाडोह - ७० टक्के - ८० टक्के
कामठी खैरी - ६९ टक्के - ९४ टक्के
रामटेक खिंडसी - ६६ टक्के - ७३ टक्के
लोवर नांद- ४० टक्के - ६७ टक्के
लोवर वणा- ३८ टक्के - ७० टक्के
इडियाडोह - ५८ टक्के - ४३ टक्के
सिरपूर - ४४ टक्के - ५५ टक्के
पुजारी टोला - ७३ टक्के - ७५ टक्के
कालिसरार - ६२ टक्के - ६३ टक्के
ईरई - ३२ टक्के - ८४ टक्के
बोर - ३९ टक्के - ६७ टक्के
लोअर वर्धा- १ - ५२ टक्के- ६६ टक्के
गोसीखुर्द - ३५ टक्के - २७ टक्के
बावनथडी - ३१ टक्के - ७५ टक्के