झोपडपट्टीतील मजुराच्या मुलीने गाठला एमपीएससीचा टप्पा, मंत्रालयात मिळाली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:49 AM2023-07-15T11:49:38+5:302023-07-15T11:51:20+5:30
भीमनगर येथील अंकिता नारळे एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण
नरेंद्र कुकडे
हिंगणा (नागपूर) : तालुक्यातील इसासनी ग्राम पंचायत अंतर्गत भीमनगर झाेपडपट्टी येथील एका मजुराच्या मुलीने कुठल्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता केवळ वाचनालयात अभ्यास करून एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. मुंबई मंत्रालयात क्लर्क म्हणून तिची नियुक्ती झाली आहे.
वडलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील ढासळलेल्या परिस्थितीवर मात करीत अंकिताने एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलेल्या अंकिताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
अंकिताचे प्राथमिक शिक्षण स्थानिक जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. दहावीच्या परीक्षेत ६४ टक्के गुण घेऊन ती उत्तीर्ण झाली. त्यांनतर तिने नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेऊन एमएससी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. मोठ्या बहिणीचे लग्न झाले. वडिलांना त्याच वेळी कॅन्सर सारख्या आजाराने घेरले. त्यामुळे, खासगी शिकवणी सुद्धा लावण्याची परिस्थिती नव्हती. त्यामुळे तिने याच भागातील पोलिसनगर येथे असलेल्या वाचनालयात जाऊन अभ्यास सुरू केला.
हे सर्व सुरू असतानाच वर्षभरापूर्वी वडिलांचे निधन झाले. पुन्हा अभ्यासात खंड पडणार असे वाटत असतानाच, तिची थोरली बहीण कांचन देवधरे (नारळे) व भाऊजींनी तिच्या कुटुंबातील सदस्यांना मदतीचा हात पुढे केला. त्यांनतर तिने चिकाटीने अभ्यास सुरू ठेवला व एमपीएससीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण झाली. तिने यशाचे श्रेय आई व ज्या वडिलांनी मजुरी करून प्रोत्साहन दिले त्या स्वर्गीय वडीलाना आणि बहीण-भाऊजी यांना दिले आहे. तिची धाकटी बहीण सुद्धा पदवी प्राप्त असून स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे.
अभ्यास, मेहनत व नियमित सराव केल्यास कुठलीही परीक्षा अवघड नाही. यशाला महागड्या शिकवणीची गरज नाही. यापुढे आणखी वरच्या पदाकरिता आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहे.
- अंकिता नारळे