नागपुरातील वस्त्यांमध्ये महिनाभरापासून पाणी साचले; अनारोग्याचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:57 AM2020-08-26T11:57:16+5:302020-08-26T11:59:18+5:30
नागपूर शहरात कोरोनाचा ससर्ग वाढत असतानाच दुसरीकडे शहरालगतच्या भागातील वस्त्यांत गेल्या एक - दीड महिन्यापासून पावसाचे पाणी साचून आहे. दुर्गधी व डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाचा ससर्ग वाढत असतानाच दुसरीकडे शहरालगतच्या भागातील वस्त्यांत गेल्या एक - दीड महिन्यापासून पावसाचे पाणी साचून आहे. दुर्गधी व डासांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आजार वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
प्रभाग क्रमांक २९ मधील गुलमोहर कॉलनी लगतच्या समाधान नगर परिसरात पाणी साचून आहे. येथे रस्त्याचे डांबरीकरण केले परंतु पावसाळी नाली व गडरलाईन न टाकल्याने रिकाम्या प्लॉटवर पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले आहे.
प्रभाग २८ मधील रामकृष्ण नगर, सेनापती नगर, सर्वस्वी नगर व योगेश्वर नगर यासह अनेक वस्त्यांत पाणी साचून आहे. प्रभाग क्रमांक २ मधील नारा, नारी, प्रभाग ३ मधील विनोबा भावे नगर, प्रभाग ६ मधील यादव नगर, चिमूरकर ले-आऊट, एकता कॉलनी, हाउसिंग बोर्ड कॉलनी, पंचशील नगर व हनुमान सोसायटी, प्रभाग २५ मधील पारडी, विनोबा भावे नगर, प्रभाग २६ मधील वाठोडा ले - आऊट, प्रभाग ३४ मधील बेलतरोडी यासह अनेक वस्त्यांत पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी पावसाळी नाल्या व गडरलाईनची व्यवस्था नसल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने परिसर अजूनही जलमय आहे.
धूर व औषध फवारणीची मागणी
बदलत्या वातावरणामुळे सर्दी, ताप, खोकल्यासारखे आजार उफाळून येत असतानाच शहराच्या कानाकोपऱ्यात घोंगावणाऱ्या डासांनी नागरिकांची झोप उडविली आहे. रात्री आणि दिवसादेखील डासांपासून सुटका करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमित धूर आणि औषध फवारणी करण्याची मागणी होत आहे.
बगिच्यातही डासांचा त्रास
मैदाने, बगिच्यांमध्ये तर संध्याकाळी आणि रात्रीच नव्हे तर दिवसाही डास घोंगावत असल्यामुळे लहान मुलांसह मोठ्या माणसांनाही या डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. प्रभागातील कचरा नियमित उचलण्यासह पाणी साचणाऱ्या आणि कचरा साचलेल्या ठिकाणी नियमित फवारणी केल्यास डासांच्या अळ्या नष्ट होऊ शकतील, मात्र प्रशासनाकडून मागणीनंतरही फवारणी केली जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे.