लघु व मध्यम उद्योगातून रोजगाराचे जाळे विणणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 11:19 AM2019-06-05T11:19:01+5:302019-06-05T11:20:38+5:30

बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणे. प्रत्येक तालुक्यात लघु उद्योगांचा विकास करणे हा पुढील पाच वर्षाचा प्रमुख अ‍ॅक्शन प्लॅन असल्याची माहिती रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली.

Small and medium enterprises will employ a network of jobs | लघु व मध्यम उद्योगातून रोजगाराचे जाळे विणणार

लघु व मध्यम उद्योगातून रोजगाराचे जाळे विणणार

Next
ठळक मुद्देकृपाल तुमाने यांनी सांगितला अ‍ॅक्शन प्लॅन लोकमत भवन येथे सदिच्छा भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेरोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देणे. ग्रामीण भागात स्वयंरोजगाराला चालना देणे. प्रत्येक तालुक्यात लघु उद्योगांचा विकास करणे हा पुढील पाच वर्षाचा प्रमुख अ‍ॅक्शन प्लॅन असल्याची माहिती रामटेक लोकसभा मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने यांनी दिली. तुमाने यांनी मंगळवारी ‘लोकमत भवन’ येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करताना रामटेक लोकसभा मतदार संघाच्या विकासाचा रोड मॅप सांगितला.

आपल्या विजयाची प्रमुख कारणे?
रामटेक लोकसभा मतदार संघातील जनतेने माझ्यावर प्रेम केले. गेली पाच वर्षे मी मतदार संघ पिंजून काढला. निधी वाटपात कुणाशीही भेदभाव केला नाही. लहान असो वा मोठा, प्रत्येक कार्यक्रमात सहभागी झालो. निवडणूक प्रचारात शिवसेनेला भाजपाच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांनी ताकद दिली. त्यामुळे विजय निश्चित होता.

गत पाच वर्षातील प्रमुख कामे?
रामटेकच्या भागात मोठ्या प्रमाणात मॅगनीज आढळले. यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प भिलाई येथे जात होता. आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला व संबंधित ८६० कोटींचा प्रकल्प सावनेर तालुक्यातील खापा येथे मंजूर करून घेतला. यातून सुमारे दोन हजार युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. मतदार संघात आयआयएम, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी सुरु झाली. मिहानमध्ये नवीन कंपन्या आल्या.

पुढील पाच वर्षांचा संकल्प?
मतदार संघातील प्रत्येक बेरोजगार युवक आणि युवतीला रोजगार मिळवून देणे हे पुढील पाच वर्षातील महत्त्वाचे टार्गेट आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विभागाचाही कार्यभार आहे. या माध्यमातून मतदार संघात रोजगारांच्या संधी कशा उपलब्ध होतील. यावर आपला फोकस असेल. प्रत्येक तालुक्यात लघु व मध्यम उद्योगांच्या माध्यमातून रोजगाराचे जाळे विणले जाईल. यासोबतच मेट्रो रेल्वे प्र्रकल्पाचा कामठी, बुटीबोरी, कळमेश्वर, हिंगणा, वाडीच्या शेवटच्या टोकापर्यंत विस्तार केला जाईल.

शेतकऱ्यांसाठी काय करणार?
शेतकरी हा माझा कणा आहे. शेतमालाला योग्य भाव मिळावा, यासाठी मी आधीपासूनच आग्रही आहे. काटोल, नरखेड आणि कळमेश्वर तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. संत्रा उत्पादक संकटात आहे. त्यांना सरकारकडून निश्चितच बळ दिले जाईल. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारने दुष्काळी भागात कामे सुरु केली आहे. संत्रा उत्पादकांना नुकसान भरपाई करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू केला आहे.

पर्यटन विकासाला कशी चालना देणार?
रामटेक मतदार संघात पर्यटन विकासास अधिक संधी आहे. मध्य प्रदेश सरकार पेंच प्रकल्पाच्या माध्यमातून विकास साधू शकते तर आपण का नाही? रामटेक तालुक्यात या दृष्टीने मी संसदीय समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. चिचोली ते ड्रॅगन पॅलेस असे टुरीस्ट सर्किट तयार केले जाईल. यात नगरधन किल्ला, खिंडसी, मनसर, अदासा, धापेवाडा, अंभोरा आदी प्रमुख पर्यटन स्थळाचा पाच वर्षात विकास केला जाईल.

जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेत कशी सुधारणा होईल?
ग्रामीण भागात आजही नागरिकांना अद्ययावत आरोग्य सुविधा मिळत नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपजिल्हा रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासाठी गत पाच वर्षे केंद्र आणि राज्य सरकारकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. पश्चिम महाराष्ट्रात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विकासाची जबाबदारी काही खासगी स्वयंसेवी संस्थाकडे सोपविण्यात आली होती. प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात आला. नागपूर जिल्ह्यात अशा प्र्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य सुविधेत सुधारणा करण्यावर आपला भर असेल.

नितीन गडकरींशी चर्चा
गत पाच वर्षांत रामटेक मतदार संघाचा लूक निश्चितच बदलला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जिल्हा विकास निधीतून मतदार संघात भरपूर कामे झाली. आता भूपृष्ठ वाहतूक, राष्ट्रीय महामार्ग विभागासह सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम विभागाचा कार्यभार गडकरी यांच्याकडे आला आहे. या खात्याच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यात रोजगाराचे जाळे कसे विणता येईल, याबाबत गडकरी यांच्याशी मी चर्चा केली. नागपूर जिल्हा लघु व मध्यम उद्योगांच्या विकासात देशात आदर्श प्रस्थापित करेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला असल्याचे तुमाने यांनी सांगितले.

Web Title: Small and medium enterprises will employ a network of jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.