पूल छोटा, धोका मोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:07 AM2021-07-17T04:07:17+5:302021-07-17T04:07:17+5:30

कमी उंचीचे पूल ठरताहेत धोकादायक विजय नागपुरे कळमेश्वर : कमी उंचीच्या पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने कळमेश्वर तालुक्यातील गोवरी ...

The smaller the pool, the greater the danger | पूल छोटा, धोका मोठा

पूल छोटा, धोका मोठा

Next

कमी उंचीचे पूल ठरताहेत धोकादायक

विजय नागपुरे

कळमेश्वर : कमी उंचीच्या पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने कळमेश्वर तालुक्यातील गोवरी पुलावर वाहून गेलेल्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे जीवघेणे ठरत असलेल्या तालुक्यातील पुलांची उंची वाढविण्याच्या मागणीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कमी उंचीच्या पुलांचा घेतलेला हा आढावा.

---

ग्रामीण भागात गावांना जोडणारा सेतू म्हणजे मार्गातील पूल. मात्र कळमेश्वर तालुक्यातील बहुतांशी पूल पावसाळ्याच्या दिवसांत पाण्याखाली जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटतो. यात कमी उंचीचे पूल ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संततधार पावसामुळे पूर येऊन पुलावरून नेहमी पाणी वाहते. त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तालुक्यातील पुलांची उंची वाढविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. मात्र लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे या समस्यांची दखल घेतली नाही. गोवरी येथील शेतकरी अन्नाजी निंबाळकर व प्रवीण शिंदे यांचा दि. ८ जुलैला कळमेश्वर (गावरी)जवळील पुलावर आलेल्या पुरात वाहून मृत्यू झाला. त्यामुळे पुलांची उंची वाढविण्यासाठी अजून किती नागरिकांचा बळी द्यावा लागणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. तालुक्यात १०६ गावांचा समावेश आहे. या गावांना रस्त्यांच्या माध्यमातून कळमेश्वर या तालुक्याच्या ठिकाणाला जोडले गेले आहे. या मार्गात येणाऱ्या नदीनाल्यांवर संबंधित विभागाकडून पूल बांधण्यात आले. मात्र हे पूल रस्त्यांच्या उंचीपेक्षा कमी उंचीचे असल्याने पावसाळ्यात नेहमी पाण्याखाली येतात. कळमेश्वर ते उपरवाही, निंबोली ते उपरवाही, उपरवाही ते खैरी (हर्जी), दहेगाव ते खडगाव, गोवरी ते सिंदी, सुसुंद्री ते वाठोडा, वरोडा शिवारातील शेतात जाणारा पूल, सोनेगाव ते पोही, आदी मार्गावर कमी उंचीचे पूल बांधण्यात आले आहेत. यामुळे पावसाळ्यात संततधार पाऊस झाल्यास या गावांचा तालुक्यासोबत नेहमी संपर्क तुटतो. शिवाय कळमेश्वर तालुक्याचे ठिकाण असल्याने बँक, तहसील कार्यालय, पंचायत समिती, दवाखाने, आठवडी बाजार, आदी कामांसाठी येथे वारंवार ये-जा करावी लागते. मात्र पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असल्याने त्यांना पूर ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागते. अनेकदा संततधार पावसात नागरिकांना अडकून पडावे लागते. विद्यार्थ्यांनाही शाळेला सुट्टी मारावी लागते. या व्यतिरिक्त प्रवासी वाहनांची वाहतूक प्रभावित होते. या समस्यांची दखल घेत तालुक्यातील पुलांची उंची वाढविण्याची मागणी खैरी (लखमा) चे सरपंच सचिन निंबाळकर, उपसरपंच देवराव काळे, पंकज झोड, राहुल निंबाळकर, उपरवाहीचे सरपंच चंद्रप्रकाश साठवने, सावंगीचे माजी सरपंच संजय तभाने, लोणाराच्या सरपंच सरला दुपारे, उपसरपंच साहेबराव डेहणकर, देवेंद्र पन्नासे, वरोड्याचे सरपंच दिलीप डाखोळे, उपसरपंच नरेश काकडे, अंकित राऊत, ग्रामपंचायत मोहगावचे सदस्य प्रशांत मडावी, मनसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल चौधरी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत अतकरी, आदींनी केली आहे.

दहा गावांचा तुटतो संपर्क

कळमेश्वर-गोवरी मार्गावर असलेल्या पुलाची उंची खूपच कमी असल्याने दोन-तीन तास जरी संततधार पाऊस झाला तरी या पुलावरून नेहमी पाणी वाहत असते. अशा वेळी कळमेश्वरसह तोंडाखैरी, बेल्लोरी, बोरगाव (खुर्द), गोवरी, वलनी, पारडी, खंडाळा, खैरी (लखमा), आदी आठ ते दहा गावांचा संपर्क तुटतो. पुरामुळे ही गावे प्रभावित होत असून, जनजीवन विस्कळीत होते. या सर्व गावांतील नागरिकांचा कळमेश्वर शहराशी सतत संपर्क येतो. या समस्येबाबत ग्रामस्थांनी अनेकदा स्थानिक लोकप्रतिनिधींजवळ तक्रारी केल्या; परंतु अद्यापही त्यावर तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थांत रोष निर्माण होत आहे.

किमान कचरा साफ करा

कमी उंचीच्या पुलाखालील घाण व कचरा किमान पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे गरजेचे आहे. मात्र त्याकडेही संबंधित विभागाचे दुर्लक्ष असते. सध्या पावसाळा सुरू असतानाही अनेक पुलांखाली मोठ्या प्रमाणात कचरा व घाण साचली आहे. त्यामुळे नदीनाल्यांवरील पाण्याचा प्रवाह थांबतो. याचा पुलांच्या मजबुतीवर परिणाम होत आहे. वरोडा-घोराड मार्गालगत असलेल्या नाल्यावर शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांनी लोकसहभागातून पूल बांधला आहे. या पुलावरून परिसरातील शेतकरी वहिवाट करतात; परंतु पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पूल पाण्याखाली येतो.

Web Title: The smaller the pool, the greater the danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.