स्मार्ट कार्ड, वर्षभरातच खराब
By admin | Published: May 16, 2016 03:16 AM2016-05-16T03:16:09+5:302016-05-16T03:16:09+5:30
प्रादेशिक परिवहन विभागातून कायमस्वरूपी वाहन परवान्यासाठी आधी ९० रुपये शुल्क आकारले जात होते.
आरटीओ : वाहनधारकांना पडतो भुर्दंड
नागपूर : प्रादेशिक परिवहन विभागातून कायमस्वरूपी वाहन परवान्यासाठी आधी ९० रुपये शुल्क आकारले जात होते. ‘स्मार्ट कार्ड’ योजना लागू झाल्यापासून वाहनधारकाला ३१३ रुपये मोजावे लागत आहेत. मात्र वर्षभरातच हे कार्ड खराब होऊन डुप्लिकेट कार्डसाठी पुन्हा एवढेच शुल्क भरण्याचीे वेळ येत असल्याने वाहनधारकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
दलालांना फाटा देण्यासाठी व कामाला गती येण्यासाठी आरटीओ कार्यालयाने आॅक्टोबर २००६ पासून ही योजना सुरू केली. शिकाऊ व पक्का वाहन परवाना तयार करण्याचे काम हैदराबादच्या युनायटेड टेलिकॉम कंपनीला देण्यात आले. कायम परवान्यासाठी लागणाऱ्या ३१३ रुपये शुल्कामधून १६२ रुपये ७० पैसे आरटीओला मिळतात. उर्वरित रक्कमेतून ५० रुपये टपाल खात्याला तर शिल्लक रक्कम या कंपनीला मिळते. सुरुवातीची काही वर्षे या कंपनीने चांगले कार्ड दिले, परंतु गेल्या काही वर्षांपासून कार्डाचा दर्जा खालवला असून वर्षभरातच कार्ड खराब होत असल्याच्या तक्रारी आहेत. यात कार्डवरील ‘प्लास्टीक कव्हर’ निघणे, फोटो व नाव पुसट होणे, कार्डातील चिप खराब होणे आदी तक्रारी आहेत. विशेष म्हणजे, परवाना खराब झाल्याच्या कारणावरून काही वाहतूक पोलीस आर्थिक दंड वसूल करीत असल्याच्याही तक्रारी आहेत. खराब कार्ड बदलविण्यासाठी आरटीओच्या युटीएल विभागाकडे तक्रार केल्यावर त्यांच्याकडून डुप्लिकेट अर्ज करण्याची सूचना केली जाते. यामुळे परत अर्ज भरा, शुल्कासाठी रांगेत लागा आणि नंतर कार्ड मिळण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ येते. वर्षभरात कार्ड खराब होत असेल तर त्याचे शुल्क आकारू नये, अशी मागणीही वाहनधारकांकडून होत आहे.(प्रतिनिधी)
कार्डला लॅमिनेशन करू नये
वाहन परवानाच्या स्मार्ट कार्डला लॅमिनेशन करू नये. यामुळे परवाना लवकर खराब होत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्या जागी कागदाचे पॅकेट वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला. विशेष म्हणजे, प्रत्येक परवान्यासोबत संबंधित कंपनी कागदाचे पॅकेट देते, परंतु पोस्ट खाते या पॅकेटमध्ये परवाना टाकण्यास टाळाटाळ करते. यामुळे विना पॅकेट वाहनचालकांना परवाना मिळतो.