स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक : पुन्हा एकटे पडले मुंढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 10:24 PM2020-07-31T22:24:23+5:302020-07-31T22:25:28+5:30
नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचे सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरीसाठी शुक्रवारी प्रस्ताव सादर केला. परंतु स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या १३ सदस्यांनी प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत आयुक्त मुंढे स्मार्ट सिटीच्या बैठकीत पुन्हा एकटे पडले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बैठकीत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कंपनीचे सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरीसाठी शुक्रवारी प्रस्ताव सादर केला. परंतु स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या १३ सदस्यांनी प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत आयुक्त मुंढे स्मार्ट सिटीच्या बैठकीत पुन्हा एकटे पडले.
स्मार्ट सिटी संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी मनपा मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सदस्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या आवश्यकतेवरच प्रश्न उपस्थित केले. आजच्या बैठकीतील अजेंड्यामध्ये आयुक्त मुंढे यांनी सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयांच्या कार्यास मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.
बैठकीनंतर पत्रकारांशी केलेल्या चर्चेत महापौर जोशी यांनी सांगितले की, ऐन वेळेवर बैठक बोलावण्याची आवश्यकता काय होती, हा प्रश्न चेअरमन प्रवीण परदेसी आणि केंद्र सरकारचे दीपक कोचर यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान विचारण्यात आला. यावर परदेसी यांनी नागपूरचे सिनिअर र्कौन्सिल एस.के. मिश्रा यांचे ओपिनियन घ्यायला सांगितले. मिश्रा यांनी स्पष्ट केले की, प्रकरण न्यायालयात सुरु आहे. त्यामुळे मंडळाची बैठक घेता येत नाही. अटर्नी जनरल यांचा सल्लाही घेण्यात आला नाही. अशा परिस्थितीत घाईगडबडीने १४ फेब्रुवारी ते १० जुलै दरम्यान आयुक्तांनी सीईओ म्हणून घेतलेल्या निर्णयास मंजुरी प्रदान करता येत नाही.
महापौर जोशी यांच्यानुसार एस.के. मिश्रा यांनी स्पष्ट सांगितले की, बैठक घेता येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत विषयांना मंजुरी कशी काय देता येईल? प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. जर काही कमीजास्त झाले तर डायरेक्टर्सला दोषी ठरविले जाईल. त्यामुळे कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय एकमताने सर्व अधिकारी व राजकीय पक्षांशी जुळलेल्या निदेशकांनी घेतला. दीपक कोचर यांचेही हेच म्हणणे होते. बैठकीत १३ सदस्य एकीकडे तर मुंढे एकीकडे होते.