-तरच होईल स्मार्ट सिटी

By admin | Published: October 17, 2015 03:07 AM2015-10-17T03:07:24+5:302015-10-17T03:07:24+5:30

केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहराची निवड केली. मिहान, मेट्रो रेल्वे अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे ...

The smart city will be there | -तरच होईल स्मार्ट सिटी

-तरच होईल स्मार्ट सिटी

Next

पायाभूत सुविधांचा विकास हवा : स्थानिक प्रश्नांना हवे प्राधान्य
नागपूर : केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर शहराची निवड केली. मिहान, मेट्रो रेल्वे अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे आधीच महत्त्व वाढलेल्या या उपराजधानीचा समावेश स्मार्ट सिटी प्रकल्पात झाल्यामुळे या शहराचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
नागपूरला स्मार्ट सिटी करण्यासाठी सर्व पातळीवर धडपड सुरू आहे. सामान्य नागरिकांपासून ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सर्वांच्याच सूचना यासाठी मागितल्या जात आहे. यासाठी सर्व स्तरातून होत असलेले प्रयत्नही प्रशंसनीय आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास जावा, या शहराला सुविधायुक्त शहराचा मान मिळावा, नागपूरकरांचे जीवनमान उंचवावे यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पाला ‘लोकमत’चेही तेवढेच भक्कम पाठबळ आहे. मात्र, शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे सुरू असताना सध्या असलेल्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही. सध्या दुर्लक्षित असलेल्या या प्रश्नांची वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात हेच प्रश्न अडथळे निर्माण करणारे ठरतील. अशाच काही प्रश्नांचा उहापोह आम्ही ‘तरच होईल स्मार्ट सिटी’ या वृत्त मालिकेंतर्गत करीत आहोत. नागपूरला स्मार्ट सिटी करीत असताना नागपुरात नेमके कोणत्या बाबींवर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे, हे शासकीय यंत्रणेच्या निदर्शनास आणून देणे व नागपूरच्या सर्वांगीण विकासात हातभार लावणे हाच यामागील उद्देश आहे.(प्रतिनिधी)
स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूरच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, एवढ्या रकमेत नागपूरचा विकास करणे शक्य नाही. यासाठी किमान साडेचार हजार कोटी रुपयांची गरज भासणार आहे. मात्र, एवढा पैसा खर्च करूनही स्थानिक असुविधेकडे दुर्लक्ष झाले तर नागपूर ‘स्मार्ट’ होणार नाही. स्मार्ट सिटी होत असताना नागपूरचा झपाट्याने विस्तार होणार आहे. बांधकामे वाढतील. इतर शहरांतून रोजगारासाठी येणाऱ्यांचे प्रमाण वाढेल. एकूणच या शहरातील नागरी सुविधांवरील भार वाढणार आहे. हा भार पेलविण्यासाठी नागपूर सक्षम आहे का ? नसेल तर आधी ते करावे लागेल. तरच नागपूर स्मार्ट सिटी होईल.
स्मार्ट सिटी करताना या शहरातील रस्ते, पथदिवे, नाल्या, गटारी आदींमध्ये मोठी सुधारणा करावी लागेल. शहराची स्वच्छता, डम्पिंगची सोय, कचऱ्यावर प्रक्रिया करावी लागेल. बायोमेडिकल वेस्टची योग्य विल्हेवाट, जास्तीत जास्त सांडपाण्यावर प्रक्रिया करावी लागेल. पावसाळी नाली, नदीनाल्यांची स्वच्छता करून गडर लाईनची सोय करावी लागेल. पथदिव्यांची व्यवस्था करून ऊर्जा बचत प्रकल्प राबवावे लागतील. अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवून फूटपाथ मोकळे करावे लागतील. नागरिकांना चालण्यासाठी फूट ओव्हर ब्रिज तयार करावे लागतील. आग विझविणारी यंत्रणा स्मार्ट हवी. अवैध व नियोजनात अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांवर कारवाई करावी लागेल.
शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, वृक्षारोपण व संवर्धन, तलावांचे संवर्धन आदी बाबींवर लक्ष द्यावे लागेल. येथील विमानतळ, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर सुविधा हव्या. शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महापालिकेसह सर्व शासकीय यंत्रणेमार्फत दिली जाणारी आरोग्य सेवा अधिक सक्षम करावी लागेल. शहरातील सर्वच भागात २४ तास स्वच्छ पाणीपुरवठा करावा लागेल. उद्याने व बाजारपेठांचा विकास, मेट्रो रिजनचा नियोजनबद्ध विकास, सार्वजनिक ठिकाणी पार्किंगची सोय, शॉपिंग झोन, फूड पार्क, कन्व्हेंशनल सेंटर आदी उभारावे लागतील.

उपराजधानीत सुमारे दोन लाख युवक बेरोजगार आहेत. या बेरोजगांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करावी लागेल. या शहरात आंतरराष्ट्रीय पातळीवरील शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल. शासकीय यंत्रणेला लागलेली भ्रष्टाचाराची उधळी नष्ट करावी लागेल. या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले व विकासात येणारे हे अडथळे दूर केले तरच नागपूर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी होईल.

Web Title: The smart city will be there

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.