विद्यापीठात ‘स्मार्ट क्लासरुम’

By admin | Published: February 2, 2016 02:57 AM2016-02-02T02:57:09+5:302016-02-02T02:57:09+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये वर्गांना विद्यार्थी उपस्थित नसतात व विभागप्रमुखांना याची माहितीच नसते, ...

'Smart classroom' at university | विद्यापीठात ‘स्मार्ट क्लासरुम’

विद्यापीठात ‘स्मार्ट क्लासरुम’

Next

जनसंवाद विभागातील वर्गखोल्यांमध्ये लागले ‘सीसीटीव्ही’ : विभागप्रमुखांचा राहणार ‘वॉच’
योगेश पांडे नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमध्ये वर्गांना विद्यार्थी उपस्थित नसतात व विभागप्रमुखांना याची माहितीच नसते, अशी ओरड होत असते. यासंदर्भात नागपूर विद्यापीठाने ‘स्मार्ट क्लासरुम’कडे एक पाऊल पुढे टाकले असून आता विभागप्रमुखांना थेट कक्षातूनच विद्यार्थ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येणार आहे. विद्यापीठाच्या जनसंवाद विभागात ठिकठिकाणी ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसविण्यात आले असून यात वर्गखोल्यांचादेखील समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या हालचालींसोबतच, त्यांच्या सुरक्षेकडेदेखील एका ‘क्लिक’द्वारे लक्ष ठेवता येणार आहे.
नागपूर विद्यापीठात तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आमूलाग्र बदल दिसून येत आहेत.
परीक्षा प्रणालीप्रमाणेच विभागदेखील ‘आॅनलाईन’ व्हावेत असा प्रशासनातील अधिकाऱ्यांचा आग्रह आहे. विद्यापीठाला ‘नॅक’तर्फे मिळालेला ‘अ’ दर्जा लक्षात घेता विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ तसेच इतर पदव्युत्तर विभागांत ‘स्मार्ट क्लासरूम’ उभारण्यासाठीदेखील मागील अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. अखेर जनसंवाद विभागापासून याची सुरुवात करण्यात आली. काही दिवसांपूर्वीच जनसंवाद विभागात अत्याधुनिक असे १६ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात आले आहेत. विभागातील वर्गखोल्या, कार्यालय, संगणक कक्ष, स्टुडियो, एडिटिंग रुम, प्रवेशद्वार यांच्यासह विभागप्रमुखांच्या कक्षाचादेखील समावेश आहे.

सुरक्षेसाठी होणार मदत
विद्यापीठाच्या ‘कॅम्पस’ची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर जनसंवाद विभाग हा कोपऱ्यात असून याच्या परिसरात बाहेरील व्यक्तीने प्रवेश करणे सहज शक्य आहे. प्रसारमाध्यमांच्या कार्यप्रणालीचे शिक्षण देणाऱ्या या विभागातील ‘स्टुडिओ’मध्ये महागडे कॅमेरे, अत्याधुनिक एडिटिंग मशीन तसेच संगणकांचा समावेश आहे. या महागड्या उपकरणांच्या सुरक्षेसाठीदेखील ‘सीसीटीव्ही’ची मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थिनींची सुरक्षा लक्षात घेता विद्यापीठ अनुदान आयोगानेदेखील यासंदर्भात निर्देश दिले होते. त्यामुळे अभ्यागतांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे, असे मत विभागप्रमुख डॉ.धर्मेश धवनकर यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये शिस्त वाढेल
विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांमधील वर्गखोल्या अनेकदा रिकाम्याच दिसतात. कधी विद्यार्थीच नसतात, तर कधी प्राध्यापक वर्गच घेत नाही. जनसंवाद विभागात नियमित वर्ग होत असले तरी विद्यार्थ्यांची पूर्ण उपस्थिती नसते. शिवाय अनेक विद्यार्थी एका वर्गानंतर चालले जातात. ‘सीसीटीव्ही’मुळे आता विभागप्रमुखांचे थेट वर्गखोल्यांवर लक्ष राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये याचा धाक राहील व त्यांच्यामधील शिस्त वाढण्यात मदतदेखील मिळेल शिक्षणप्रणालीत काळानुरूप बदल होणे आवश्यकच आहे व ‘कॅम्पस’ला अत्याधुनिक स्वरूप देणे तसेच ‘स्मार्ट क्लासरुम’ या बाबीदेखील त्यात येतात. ‘रुसा’च्या माध्यमातून शासनाकडून लवकरच अनुदान मिळण्याची चिन्हे आहेत. या अनुदानातून ज्या विभागांनी प्रस्ताव सादर केले आहेत, तेथे ‘स्मार्ट क्लासरुम’, ‘रिसर्च लॅब’ उभारण्यावर प्रशासनाचा भर राहील, अशी माहिती कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली.

Web Title: 'Smart classroom' at university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.