आग विझविण्याची यंत्रणा हवी स्मार्ट
By admin | Published: October 18, 2015 03:14 AM2015-10-18T03:14:48+5:302015-10-18T03:14:48+5:30
उपराजधानीची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या दृष्टीने शहर विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
अत्याधुनिक यंत्रसामुग्री नाही : मनुष्यबळाचीही कमतरता
नागपूर : उपराजधानीची ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. या दृष्टीने शहर विकासाचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु स्मार्ट सिटीचा वाढता पसारा बघता ‘फायर मॅनेजमेंट’साठी आवश्यक असलेली अत्याधुनिक यंत्रणा महापालिकेकडे नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्यक असलेले मनुष्यबळ नाही. गल्लीबोळातील किंवा बहुमजली इमातीत लागलेली आग असो, अपुऱ्या यंत्रसामुग्रीमुळे ती विझविण्यासाठी अग्निशमन विभागालाच जीवन मरणाची परीक्षा द्यावी लागते, ही वास्तविकता आहे. भविष्यातील अग्नितांडव टाळण्यासाठी अग्निशमन विभागही स्मार्ट करणे आवश्यक आहे.
मेट्रो रेल्वे, मिहान यासारख्या प्रकल्पासोबतच शहरात ६५ मीटरहून अधिक उंचीच्या टोलेजंग इमारती उभ्या राहात आहेत. तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागावर मेट्रो रिजनमधील नऊ तालुक्यांची जबाबदारी आहे. सोबतच विभागातील सहा जिल्ह्यांच्या समन्वयाची जबाबदारी आहे.
परंतु विभागाकडे सुसज्ज यंत्रणेचा अभाव व मनुष्यबळाची कमतरता असल्याने कार्यक्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. १९६५ च्या लोकसंख्येच्या आधारावर शहरात अग्निशमन केंद्र व कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली होती.
पाच मिनिटात मदत कशी मिळणार?
आग लागल्यास पाच मिनिटात अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहचणे आवश्यक आहे. परंतु पार्किंगचा प्रश्न, शहरातील वाहतुकीचा अडथळा, जुन्या वस्त्यांतील अरुंद रस्ते यामुळे ते शक्य नाही. अशा परिस्थितीत पाच मिनिटात मदत कशी मिळणार असा प्रश्न आहे.