महावितरणच्या १८ कार्यालयांमध्ये लागले स्मार्ट मीटर
By आनंद डेकाटे | Published: May 31, 2024 06:06 PM2024-05-31T18:06:59+5:302024-05-31T18:25:53+5:30
स्वत:पासून सुरूवात, वीज कर्मचाऱ्यांच्या घरीही मीटर बसवणे सुरू : गोंदियात सर्वाधिक १४६ मीटर लागले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज कर्मचाऱ्यांसह अन्य काही संघटनांच्या विरोधादरम्यान नागपूर विभागात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत महावितरणच्या १८ कार्यालयांमध्ये आणि वसाहतींमधील ३२३ घरांमध्ये हे मीटर बसवण्यात आले आहेत. जूनच्या पहिल्या आठवड्यात हे मीटर सर्वसामान्यांच्या घरात किंवा आस्थापनांमध्ये बसवण्यास सुरुवात होईल, असा दावा केला जात आहे.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सर्वप्रथम महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यालयात व निवासस्थानी मीटर बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. हा उपक्रम ग्राहकांसाठी वरदान ठरेल, तसेच याची सुरुवात महावितरणने स्वतःपासून करावी, असे ते म्हणाले.
आतापर्यंत गोंदियात सर्वाधिक १४६ मीटर बसविण्यात आले आहेत. तसेच नागपूर शहरातील ६०, वर्धा ३०, भंडारा १० आणि चंद्रपुरात ९५ अशा एकूण ३४१ ठिकाणी स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये महावितरण कार्यालय आणि वीज कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचा समावेश आहे.
स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आल्याचे महावितरणने सांगितले. ग्राहकांना हे मीटर मोफत मिळत आहेत. मीटर बसवणाऱ्या कंपनीची दहा वर्षे देखभाल व दुरुस्तीचीही जबाबदारी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की या मीटरचा वापर मध्य प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांमध्ये सुरू झाला आहे. आता ग्राहकांना अचूक बिलिंग आणि नियमित वापराची माहिती मिळत आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित हे मीटर बसवल्यानंतर ग्राहकाला त्याच्या मोबाईलवर संपूर्ण माहिती मिळणार आहे. चुकीचे रीडिंग, वेळेवर मीटरचे रीडिंग न होणे, चुकीची बिले मिळणे यासारख्या समस्या दूर होतील. बिलाशी संबंधित तक्रारींवर कायमस्वरूपी तोडगा निघेल.