स्मार्ट नागपूर, ग्लोबल नागपूर
By admin | Published: September 21, 2016 02:55 AM2016-09-21T02:55:21+5:302016-09-21T02:55:21+5:30
नागपूरकरांसाठी गुडन्यूज आहे. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात नागपूर शहराचा समावेश करण्यात आला आहे.
नागपूर : नागपूरकरांसाठी गुडन्यूज आहे. केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात नागपूर शहराचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता नागपूरच्या विकासाला अधिक गती मिळणार असून नागपूरचा चेहरामोहरा बदलण्यात मोलाची मदत होणार आहे. पहिल्या यादीत संधी हुकल्यानंतर आता स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या यादीत नागपूरचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत इको सिटी, एज्युुकेशन सिटी व इलेक्ट्रॉनिक्स सिटी (ट्रीपल ई) या संकल्पनेवर नागपूरचा विकास केला जाणार आहे.
केंद्र सरकारतर्फे गेल्यावर्षी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या यादीत नागपूरचा ३५ वा क्रमांक होता. यापैकी पहिल्या २० शहरांची निवड प्रकल्पासाठी करण्यात आली होती. यानंतर नव्याने दुसऱ्या टप्प्यातील शहरांची निवड करण्यासाठी सुधारित प्रस्ताव मागविण्यात आले.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आराखड्यासाठी परिश्रम घेतले व नागपूर महापालिकेने जुन्या प्रस्तावातील त्रुटी दूर करून शहर विकासाचा समग्र आराखडा सादर केला. शेवटी सर्वांच्या प्रयत्नांना यश आले. केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी जाहीर केलेल्या स्मार्ट सिटीच्या २७ शहरांच्या यादीत नागपूर पाचव्या क्रमांकावर राहिले. महाराष्ट्रातून निवडण्यात आलेल्या पाच शहरांमध्ये तर नागपूरचा दुसरा क्रमांक लागला. (सविस्तर/२)
काय आहे
‘ट्रीपल ई’ ?
‘ई-क्यूब’ या संकल्पनेच्या आधारावर स्मार्ट सिटीचा मास्टर प्लान तयार करण्यात आला होता. फ्रान्स येथून आलेल्या चमूच्या मदतीने इको सिटी, एज्युकेशन सिटी व इलेक्ट्रॉनिक्स सिटी (ट्रीपल ई) साठी राबविण्यात येत अलेलेले उपक्रम व भविष्यातील योजनांबाबत उल्लेख करण्यात आला होता. या अंतर्गत इको सिटीसाठी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नदी, तलावांचे पुनरुज्जीवन व सौंदर्यीकरण, एज्युकेशन सिटीसाठी आयआयएम, एम्स सारख्या संस्था सुरू करणे, तसेच इलेक्ट्रानिक्स सिटी अंतर्गत ६ किलो मीटरचा स्मार्ट स्ट्रीट, शहरात सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय, स्मार्ट पार्किंग आदींचा समावेश करण्यात आला. कचरा उचलून वाहून नेण्यापर्यंतच्या एकूणच प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट व विकसित पद्धतीचाही यात उल्लेख करण्यात आला आहे.