ट्रेनमध्ये स्मार्ट फोन चोरला, फलाटावर पकडला गेला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 09:49 PM2024-05-06T21:49:59+5:302024-05-06T21:50:51+5:30

जितेंद्र रामू हत्तीमारे (वय २५, रा. शिवाजी चाैक, खसाळामसाळा) असे आरोपीचे नाव आहे.

Smart phone stolen in train, caught on platform | ट्रेनमध्ये स्मार्ट फोन चोरला, फलाटावर पकडला गेला

ट्रेनमध्ये स्मार्ट फोन चोरला, फलाटावर पकडला गेला

नागपूर : धावत्या गाडीत एका महिलेचा स्मार्ट फोन चोरल्यानंतर नागपूर स्थानकावर नवीन सावज शोधत असलेल्या भामट्याला रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जेरबंद केले. जितेंद्र रामू हत्तीमारे (वय २५, रा. शिवाजी चाैक, खसाळामसाळा) असे आरोपीचे नाव आहे.

पुरी-साईनगर शिर्डी ट्रेनने विष्णू आणि त्यांची पत्नी छाया विष्णू वनवे रविवारी ५ मे रोजी शिर्डी येथे दर्शनाला जात होते. संधी साधून चोरट्याने वनवे दाम्पत्याचे दोन स्मार्ट फोन चोरले. ही बाब लक्षात आल्यानंतर वनवे दाम्पत्याने गोंदिया रेल्वे स्थानकावर चोरीची तक्रार नोंदवली. दरम्यान, एकसाथ दोन महागड्या मोबाईलवर हात मारल्यानंतर काही तासानंतर आरोपी नागपूर रेल्वे स्थानकावर आला, फलाट क्रमांक ६ वर प्रवाशांच्या गर्दीत तो संशयास्पद अवस्थेत घुटमळत असल्याचे ध्यानात येताच रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) निरीक्षक एस. ए. राव, सहायक उपनिरीक्षक के. के. निकोड़े आरक्षक रामफल कवरती आणि सतीश कुमार यांनी त्याला घेराव घातला. त्याची गचांडी धरून त्याला चाैकीत नेल्यानंतर त्याची चाैकशी केली. त्याच्याजवळ आढळलेल्या दोन मोबाईलबाबत विचारणा केली असता तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. काही वेळेनंतर मात्र त्याने हे दोन्ही मोबाईल पुरी-साईनगर शिर्डी एक्सप्रेसमधून चोरल्याची कबुली दिली. आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली गोंदिया रेल्वे पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. चोरीच्या मोबाईलचे वर्णन आणि आरोपीकडे सापडलेल्या मोबाईलचे वर्णन सारखेच असल्याने ते दोन्ही फोन वणवे दाम्पत्याचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रविवारी रात्री आरोपी आणि मोबाईल गोंदिया पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.

तात्काळ तक्रार नोंदल्याचा फायदा
वणवे यांनी तात्काळ तक्रार नोंदल्यामुळे आरोपीकडून लगेच त्यांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले. लवकरच ते वणवे दाम्पत्यांना परत केले जातील. प्रवाशांनी कोणत्याची चोरीची तक्रार रेल्वेच्या हेल्प लाईन नंबर १३९ वर तात्काळ नोंदवावी, असे आवाहन सुरक्षा आयुक्त आर्य यांनी केले आहे.
 

Web Title: Smart phone stolen in train, caught on platform

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.