वीज कर्मचाऱ्यांच्या घरी लागले स्मार्ट प्रीपेड मीटर
By आनंद डेकाटे | Published: May 22, 2024 09:08 PM2024-05-22T21:08:06+5:302024-05-22T21:08:20+5:30
आता सर्वसामान्य ग्राहकांच्या घरी लागणार.
नागपूर : नवीन तंत्रज्ञानाने बचतीचा दावा करत महावितरणने नागपूर परिमंडळांतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमध्ये प्रथम मीटर बसविण्यात आले आहेत. आता काही दिवसांत सर्वसामान्य ग्राहकांच्या घरी जुन्या मीटरच्या जागी हे मीटर बसवण्यास सुरुवात होणार आहे.
महावितरणने कमी दाबाच्या प्रत्येक श्रेणीतील २ कोटी ४२ लाख ग्राहकांच्या घरात स्मार्ट मीटर बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यापासून केवळ कृषी पंप ग्राहकांना दूर ठेवण्यात आले आहे. वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील स्मार्ट मीटर, गेटवे आणि डेटा सेंटरमध्ये माहितीच्या देवाणघेवाणीची चाचणी घेतल्यानंतर मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. हे स्मार्ट मीटर आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केल्याचा दावा महावितरणने केला आहे. यामुळे ग्राहकांना त्यांच्या वीज खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. मीटर मोफत बसवले जात आहेत. खराब झाल्यास, ते विनामूल्य बदलले जातील. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने घेतलेला हाच निर्णय लागू राहील. मात्र या माध्यमातून ग्राहकांना विजेवर होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत हैप्पी अवर्स
ग्राहक मोबाइलप्रमाणेच स्मार्ट प्रीपेड मीटरचे ऑनलाइन रिचार्ज करू शकतील. त्यांना दररोज किती वीज वापरली गेली आणि किती उपलब्ध आहे याची माहिती दिली जाईल. संध्याकाळी ६ ते सकाळी १० पर्यंत आनंदाचे तास (हैप्पी अवर्स) असतील. या कालावधीत रक्कम संपली तरी पुरवठा खंडित होणार नाही. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही रिचार्ज संपला तरी वीज कापली जाणार नाही. ग्राहक ऑनलाइन तसेच ऑफलाइन रिचार्ज करू शकतील.
काय-काय बंद होईल
स्मार्ट मीटर बसवल्यानंतर मीटर रीडिंग, वीजबिल तयार करणे, वितरण करणे बंद होईल. मोबाईलप्रमाणेच वीज रिचार्ज करून आवश्यकतेनुसार वापरावी लागणार आहे. मानवी हस्तक्षेपामुळे चुकीचे रीडिंग किंवा सरासरी बिले येणे बंद होईल. स्मार्ट मीटरचे मासिक बिल वेबसाइट आणि मोबाइल ॲपवर उपलब्ध असेल. गरज भासल्यास ग्राहक त्याची प्रिंट काढू शकेल.