नागपूर जिल्ह्यात ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 10:47 AM2018-03-01T10:47:50+5:302018-03-01T10:47:59+5:30
तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती.
अरुण महाजन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : शासनाने विविध कल्याणकारी योजनांसोबतच ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत विविध नियमांचे पालन करणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. तालुक्यातून निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्ह्यातून प्रथम आलेल्या ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणाही शासकीय पातळीवरून करण्यात आली होती. मात्र, याला वर्ष पूर्ण होऊनही संबंधित ग्रामपंचायतींना बक्षिसांचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे यानिमित्ताने प्रशासनाची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे.
२राज्य शासनाने पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना अर्थात ‘इको व्हिलेज’ ही योजना बंद करून त्याजागी ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना सुरू केली. ही योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सन २०१६-१७ मध्ये सुरू केली. त्यासाठी विविध नियम तयार करण्यात आले. या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून प्रत्येकी एक आणि जिल्ह्यातून एका ग्रामपंचायतची निवड करण्यात आली. तालुकास्तरावरील ग्रामपंचायतला १० लाख रुपये आणि जिल्हास्तरावरील ग्रामपंचायतला ४० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याचेही सांगण्यात आले होते. हा निधी संबंधित गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करावयाचा होता.
वास्तवात, शासनाने या योजनेंतर्गत गावांची निवड केली खरी, पण संबंधित ग्रामपंचायतींना बक्षिसाची रक्कम मात्र दिली नाही.ही रक्कम बँक खात्यात कधी जमा होणार, असा प्रश्न आता संबंधित ग्रामपंचायतचे पदाधिकारी विचारत आहेत. काहींनी या दिरंगाईचे खापर प्रशासनावर फोडले असून, याला अधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप केला.
निकष व स्वरूपात बदल
राज्यातील सर्व भागातील सामाजिक व आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या निकष व स्वरूपात बदल करून ‘स्मार्ट व्हिलेज’ योजना कार्यान्वयित करण्यात आली. त्यासाठी २१ नोव्हेंबर २०१६ रोजी एक अध्यादेश जारी करण्यात आला. शिवाय, राज्यातील सर्वच ग्रामपंचायतींना या योजनेत सहभागी होण्याची संधीही उपलब्ध करून दिली. याच नवीन निकषांच्या आधारावर ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. याला १० महिने पूर्ण झाले आहेत.
सरपंच, ग्रामसेवकांचा गौरव
या योजनेंतर्गत निवड करण्यात आलेल्या ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवकांचा महाराष्ट्रदिनी १ मे २०१७ रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला होता. त्यावेळी बक्षिसांची रक्कम संबंधित ग्रामपंचायतच्या राष्ट्रीयीकृत बँकेच्या खात्यात जमा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ही रक्कम अद्यापही जमा करण्यात आली नाही.