‘त्यांच्या’ चेहऱ्यावर फुलले हसू

By admin | Published: January 12, 2016 02:56 AM2016-01-12T02:56:36+5:302016-01-12T02:56:36+5:30

दुभंगलेले ओठ किंवा चेहऱ्यावर आलेल्या विद्रुपतेला घेऊन जगताना जीवाची फार तगमग होत असते.

Smile on their 'face' | ‘त्यांच्या’ चेहऱ्यावर फुलले हसू

‘त्यांच्या’ चेहऱ्यावर फुलले हसू

Next

१०२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया : भारतीय जैन संघटना, जैन क्लब व राधाकृष्ण हॉस्पिटलतर्फे नि:शुल्क प्लास्टिक सर्जरी शिबिर
नागपूर : दुभंगलेले ओठ किंवा चेहऱ्यावर आलेल्या विद्रुपतेला घेऊन जगताना जीवाची फार तगमग होत असते. शस्त्रक्रिया हाच यावर उपाय. याची गंभीरता ओळखून भारतीय जैन संघटना, जैन क्लब नागपूर व राधाकृष्ण हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटद्वारा मनोहरलालजी ढढ्ढा यांच्या स्मृतिनिमित्त दोन दिवसीय ‘नि:शुल्क प्लास्टिक सर्जरी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराच्या पहिल्याच दिवशी सोमवारी ३५० जणांनी नोंदणी केली. याच दिवशी १०२ जणांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.
वर्धमाननगर येथील राधाकृष्ण हॉस्पिटलमध्ये आयोजित या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. लॅरी वेन्स्टेन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ. लेह, इंडियन मेडिकल असोसिएशन नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. आनंद काटे, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा पारवेकर, राधाकृष्णा हॉस्पिटलचे उपाध्यक्ष गोविंद पोद्दार, शांतीदेवी ढढ्ढा, जैन क्लबचे अध्यक्ष संजय पुगलिया, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष महावीर कोटेचा, या शिबिराचे संयोजक सुभाष कोटेचा व जैन क्लबचे प्रवक्ता अतुल कोटेचा आदी उपस्थित होते. या शिबिराला आ.कृष्णा खोपडे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
गेल्या दोन महिन्यांपासून या नि:शुल्क शिबिराची तयारी सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत या शिबिराची माहिती पोहचविण्यात आयोजन समितीला यश आल्याने शिबिरात रुग्णांची गर्दी उसळली. एक वर्षाच्या बाळापासून ते ५० वर्षाचे रुग्ण शिबिरात सहभागी झाले. यात दुभंगलेल्या ओठाने पीडित असलेल्यांपासून ते फाटलेले कान आणि चेहऱ्यावरील विविध विद्रुपतेवर उपचारासाठी विदर्भासह छत्तीसगडमधून रुग्ण आले होते.
यात लहान मुलांची संख्या सर्वाधिक होती. नि:शुल्क शस्त्रक्रियेसोबतच रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची जेवणाची आणि निवासाची सोय करण्यात आल्याने बाहेरगावावरून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सोयीचे झाले होते. (प्रतिनिधी)

यांनी घेतले परिश्रम
शिबिराच्या यशस्वीतेसाठी राधाकृष्ण हॉस्पिटलचे अध्यक्ष मथुराप्रसाद गोयल, जैन क्लबचे सचिव राजन ढढ्ढा, हॉस्पिटलचे उपाध्यक्ष कन्हैयालाल मानधना, कोषाध्यक्ष रामदत्त गोयल, सचिव जगदीश गुप्ता, जैन क्लबचे उपाध्यक्ष रजनीश जैन, सदस्य दिलीप राका, हेमंत बधानी, राजय सुराणा, अनिल पारख, सुधीर सुराणा, संजय नाटा, राजेश ढढ्ढा, विजय पुगलिया, संदीप बत्ता, डॉ. शुभम घई, आत्माराम राखुंडे, घनश्याम कोचर, शैलेश लष्करे, राकेश गांधी, विनोद कोचर, योगेश लुणावत व मनीष छलानी आदींनी सहकार्य केले.

सलग सहा तास चालल्या शस्त्रक्रिया
उद्घाटन कार्यक्रम संपताच डॉ. लॅरी वेन्स्टेन, डॉ. बॅरी सिट्रॉन, डॉ. लेह आणि यांच्या मदतीला असलेल्या डॉक्टरांच्या चमूने दुपारी १ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली. यातील निवडक १०२ रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी तयारी केली. दुपारी २ वाजेपासून ते रात्री ७ वाजेपर्यंत सलग सहा तास शस्त्रक्रिया चालल्या. सर्वच शस्त्रक्रिया यशस्वी पार पडल्या. यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. हा आनंदच गेल्या दोन महिन्यापासून राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी यशाची पावती होती. मंगळवार १२ जानेवारी हा या शिबिराचा शेवटचा दिवस असून उर्वरित रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे. ज्या गरजू रुग्णांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही त्यांनी सकाळी ९ वाजता शिबिराच्या ठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन संजय पुगलिया यांनी केले आहे. कार्यक्रमाचे संचालन डॉ. सुनील पारख यांनी केले. प्रास्ताविक संजय पुगलिया यांनी तर आभार सुभाष कोटेचा यांनी मानले.

Web Title: Smile on their 'face'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.