धुव्वाधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 01:57 AM2017-08-19T01:57:33+5:302017-08-19T02:00:25+5:30
उकाड्याच्या आणि दुष्काळाच्या झळा सोसणाºया नागपुरात रुसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावली. रात्री ८.३० नंतर बरसलेल्या पावसाने तब्बल तीन तास नॉन स्टॉप बॅटिंग केल्याने उपराजधानी चिंब झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उकाड्याच्या आणि दुष्काळाच्या झळा सोसणाºया नागपुरात रुसलेल्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावली. रात्री ८.३० नंतर बरसलेल्या पावसाने तब्बल तीन तास नॉन स्टॉप बॅटिंग केल्याने उपराजधानी चिंब झाली. शहरातील अनेक सखल भागात पाणी भरले होते. सर्व रस्ते जलमय झाले होते. तसेच बर्डी येथील लोखंडी पुलाखाली कंबरभर पाणी साचले होते. यातच मॉडेल मिल चाळीत पाणी शिरले होते. येथील राजेश खरे यांच्या घरात गुडघाभर पाणी भरले होते. धरमपेठ, शंकरनगर चौक, अलंकार टॉकीज चौक, रामदासपेठ, धंतोली, नंदनवन परिसरात जिकडे-तिकडे पाणीच पाणी असे चित्र दिसत होते. यामुळे रात्री उशिरा घरी जाणाºया नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. रात्री ११.३० वाजतापर्यंत तब्बल ७२.७ मिमी पावसाची नोंद झाली होती.
रात्री उशिरापर्यंत या पावसाचा जोर कायम होता. शुक्रवारी दिवसाची सुरुवातच रिमझिम पावसाने झाली. मात्र दुपारी कडक उन तापले. यानंतर सायंकाळ होताच आकाशात पुन्हा काळ्या ढगांची गर्दी झाली आणि रात्री ८.३० वाजताच्या सुमारास धो-धो पावसाला सुरुवात झाली. यासोबतच हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाजही खरा ठरला. या पावसाने शेतकरी सुखावला. मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात होती. धानाची रोवणी रखडली होती. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या उत्तरेकडील पश्चिम बंगाल, बिहार, उत्तराखंड व उत्तर प्रदेशात धुवाँधार पाऊस सुरू आहे. त्यानुसार मध्य भारतातही पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. यामुळे पुन्हा काही दिवस विदर्भात असेच वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ पावसासाठी व्याकुळ झाला आहे. मागील काही दिवसांत पावसाचा प्रचंड बॅकलॉग वाढला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार आतापर्यंत नागपूर जिल्ह्यात केवळ ५२२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जेव्हा की, हा आकडा ७९८.८ मिमीपर्यंत पोहचणे आवश्यक होते. याचा तालुकानिहाय विचार करता नागपूर (शहर) मध्ये ४२०.८ मिमी पाऊस झाला असून, नागपूर (ग्रामीण) मध्ये ४३९.३ मिमी, कामठी ५५९.३ मिमी, हिंगणा ४०३.४ मिमी, रामटेक ३९२.९ मिमी, पारशिवनी ४०१.१ मिमी, मौदा ३७२.३ मिमी, काटोल ३२५.६ मिमी, नरखेड २३६.० मिमी, सावनेर ३०८.२ मिमी, कळमेश्वर ३४२.४ मिमी व उमरेड तालुक्यात ३७१.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.