स्मशानातून निघणारा धूर होणार प्रदूषणरहित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:11 AM2018-03-23T00:11:57+5:302018-03-23T00:12:15+5:30
मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर स्मशानातून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करतो. हा धूर प्रदूषणरहित करण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नागपुरातही मोक्षधाम येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे येथील प्रकल्पाची पाहणी के ल्याची माहिती आरोग्य समितीच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर स्मशानातून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करतो. हा धूर प्रदूषणरहित करण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नागपुरातही मोक्षधाम येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे येथील प्रकल्पाची पाहणी के ल्याची माहिती आरोग्य समितीच्या बैठकीत गुरुवारी देण्यात आली.
चितेवरून निघणाऱ्या धुराला एका विशिष्ट प्रकारे बाहेर काढण्यात येईल. तो एका चेंबरमध्ये जमा करण्यात येईल, जेथे पाणी सोडले जाईल. यामुळे धुरातील प्रदूषणाची मात्रा कमी होईल. त्यानंतर हा धूर एका चिमणीद्वारे १०० फूट दूर उंच आकाशात सोडला जाईल. १०० फूट उंच धूर सोडण्याच्या दृष्टीने विमानतळ प्राधिकरण, नगर रचना विभाग व अन्य संबंधित विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू आहे. एका चितेला अग्नी देण्याकरिता सध्या ३०० किलो लाकडे लागतात. या प्रकल्पामुळे केवळ १५० किलो लाकडे लागतील, अशी माहिती आरोग्य अधिकारी (दवाखाने) डॉ. अनिल चिव्हाणे यांनी दिली. यावेळी आरोग्य समितीचे सभापती मनोज चाफले, उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरवार, विशाखा बांते, गार्गी चोपरा, दिनेश यादव, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे उपस्थित होते.
देवाडिया नर्सिंग होम होणार अत्याधुनिक
रुग्णांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा मिळावी, यासाठी देवाडिया नर्सिंग होम येथे लवकरच अत्याधुनिक सामुग्री उपलब्ध केली जाणार आहे. यावर १२ कोटी ९७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. देवाडियाच्याच धर्तीवर मिनीमाता रुग्णालयाचा विकास केला जाणार आहे.
सोमवारपासून कुत्र्यांची नसबंदी
कुत्र्यांचा प्रश्न सध्या गंभीर आहे. परंतु शासन निर्णयाप्रमाणे आता मोकाट कुत्र्यांना मारता येत नाही. त्यांची नसबंदी करण्याचे आदेश शासनाचे आहेत. त्यानुसार मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी खासगी एजन्सीला काम देण्याचे ठरले होते. मात्र,आता महापालिकेनेच नसबंदी करण्याचे ठरविले आहे. यासाठी तीन पशुचिकित्सकांची नियुक्ती के ली असून, सोमवारपासून ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.