धु वा धा र...
By admin | Published: June 17, 2015 02:47 AM2015-06-17T02:47:57+5:302015-06-17T02:47:57+5:30
मान्सून मागील दोन दिवसांपासून विदर्भात चांगलाच सक्रिय झाला आहे. मंगळवारी पावसाने उपराजधानीत धुंवाधार हजेरी
नागपूर: मान्सून मागील दोन दिवसांपासून विदर्भात चांगलाच सक्रिय झाला आहे. मंगळवारी पावसाने उपराजधानीत धुंवाधार हजेरी लावली. दुपारी साधारण ३.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. तब्बल एक तास तो धो-धो बरसला. यानुसार सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत एकूण ३.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय सोमवारी ५.२ मिमी पाऊस कोसळला होता. हवामान विभागाने १६ जूनपासून विदर्भात मान्सूनचा जोर वाढेल, असा यापूर्वीच अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार मागील तीन दिवसांपासून वातावरण तयार होऊ लागले आहे. मंगळवारी दुपारी ३ वाजतापर्यंत चांगले ऊन तापले. परंतु ३.३० वाजता दरम्यान अचानक आकाशात ढगांची गर्दी झाली, आणि काहीच वेळात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाला सुरुवात झाली. तो सायंकाळी ४.३० वाजतापर्यंत सुरू होता. यानंतर पावसाचा जोर कमी झाला. या धो-धो पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली होती. (सविस्तर पान २ वर)
वीज पडून मुलीचा मृत्यू
मंगळवारी तकिया धंतोली परिसरातील एका दहा वर्षाच्या मुलीच्या अंगावर वीज पडल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. पायल मधुकर मऱ्हसकोल्हे असे तिचे नाव आहे. दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. पायल ही सुळे हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिकत होती. मंगळवारी दुपारी ती आपल्या इतर चार-पाच मैत्रिणींसह घरापुढे खेळत होती. दरम्यान तिथे अचानक वीज कोसळली. यात पायलचा मृत्यू झाला.