‘सिक्युरिटी’शिवाय स्मृती इराणी पोहोचल्या नागपुरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 08:39 AM2018-10-23T08:39:27+5:302018-10-23T08:42:50+5:30
सोमवारी नागपुरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या सुरक्षाव्यवस्थेविना नागपुरात फिरत असल्याचे दिसून आले. आपल्या गुप्त दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली.
नागपूर - एरवी केंद्रीय मंत्री म्हटले की, सुरक्षाव्यवस्थेचा घेरा व कार्यकर्त्यांचा लवाजमा असे चित्र असते. मात्र सोमवारी नागपुरात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी या सुरक्षाव्यवस्थेविना नागपुरात फिरत असल्याचे दिसून आले. आपल्या गुप्त दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. सोबतच दिवसभरात संघ व राष्ट्रसेविका समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांची भेटदेखील घेतली.
रेशीमबाग परिसरात संघ परिवारातील महिला पदाधिकाऱ्यांच्या एका समन्वय वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गात स्मृती इराणी सहभागी झाल्या होत्या. तत्पूर्वी दुपारी 12च्या सुमारास त्यांनी संघ स्मृतिमंदिराला भेट दिली. त्यानंतर त्या थेट धंतोली येथे गेल्या व तेथे त्यांनी अहिल्या मंदिर येथे राष्ट्रसेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलताई मेढे यांची भेट घेतली. त्यानंतर त्या परत रेशीमबाग येथे रवाना झाल्या. बैठकीचे सत्र आटोपून सायंकाळी त्या हवाईमार्गाने मुंबईकडे गेल्या. दरम्यान, आपल्या या दौऱ्यात त्यांनी सुरक्षाव्यवस्था सोबत घेतली नाही. विमानतळावरच सुरक्षारक्षक आले होते. मात्र त्यांनी सुरक्षाव्यवस्था नाकारली. केवळ जिल्हाधिकारी कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या गाडीचा चालक, स्वीय सहायक हेच सोबत होते. स्मृती इराणी यांचा हा दौरा अतिशय गुप्त ठेवण्यात आला होता. ‘लोकमत’ने अहिल्यामंदिर येथे स्मृती इराणी यांना दौऱ्याबाबत विचारणा केली. मी येथे एका कार्यक्रमासाठी आले आहे. हा शासकीय कार्यक्रम नसल्यामुळे मी सुरक्षाव्यवस्था नाकारली. प्रमिलताई मेढे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी त्यांची भेट घेतली. ही राजकीय भेट नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
लहान मुलांमध्ये रमल्या इराणी
अहिल्यामंदिर येथे दुपारी दोनच्या सुमारास बालवाडी सुरू होती. यावेळी चिमुकल्या मुलांसह स्मृती इराणी यांनी थोडा वेळ घालविला. या मुलांचे फोटो काढण्याचा मोह त्यांना देखील आवरता आला नाही. मुलांची विचारपूस करून मग त्या रेशीमबागकडे रवाना झाल्या. रेशीमबागेत त्यांनी संघाच्या काही पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरक्षेविना हा दुसरा दौरा
सुरक्षाव्यवस्थेविना संघभूमीचा हा स्मृती इराणी यांचा पहिलाच दौरा नाही. याअगोदर 26 ऑगस्ट 2015 रोजी इराणी यांनी अतिशय गुप्तपणे संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील कुठलाही लवाजमा सोबत न घेता अतिशय गुपचूपपणे इराणी नागपूरला आल्या होत्या.