स्मृती इराणी यांनी घेतली सरसंघचालकांची भेट
By admin | Published: August 27, 2015 02:43 AM2015-08-27T02:43:38+5:302015-08-27T02:43:38+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली.
तासभर झाली चर्चा : गोपनीय ठेवला दौरा
नागपूर : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. सुमारे तासभर दोघांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री असूनही कोणताही लवाजमा सोबत न घेता अतिशय गुपचूपपणे इराणी नागपूरला आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या या भेटीचे गूढ अधिक वाढले आहे.
स्मृती इराणी सकाळच्या सुमारास नागपुरात आल्या. विमानतळाहून त्यांनी थेट संघ मुख्यालयच गाठले. मुख्यालयात आल्यानंतर त्या थेट सरसंघचालकांना भेटण्यासाठीच गेल्या. मुख्यालयातील अनेकांना त्या आल्या आहेत याची माहिती नव्हती. सकाळी १० ते ११ या कालावधीत दोघांमध्ये चर्चा झाली व ११.१५ च्या सुमारास त्या विमानतळाकडे निघून गेल्या. दुपारी १२.५० च्या विमानाने त्या दिल्लीकडे रवाना झाल्या. (प्रतिनिधी)
दौऱ्यामुळे तर्कवितर्कांना उधाण
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृती इराणी यांच्यावर विरोधकांनी सातत्याने टीका केली आहे. या टीकेला कामातून उत्तर देण्यात यावे, असा सल्ला सरसंघचालकांनी त्यांना दिला. शिवाय संस्कृत भारतीतर्फे संस्कृतच्या प्रसारासाठी राबविण्यात येणारी मोहीम, पारंपरिक मूल्यांचा शिक्षण प्रणालीत समावेश होण्याची आवश्यकता यावर या भेटीत चर्चा झाली. परंतु भेटीत राजकीय मुद्दे व भाजपाच्या अंतर्गत राजकारणाबाबत काय चर्चा झाली, याबाबत सरसंघचालकांच्या निकटवर्तीयांना माहिती नाही. संघातर्फे याबाबत मौन साधण्यात आले आहे. स्मृती इराणी यांनी हा दौरा अतिशय गुप्त ठेवला होता. फारशी सुरक्षा व्यवस्था त्यांच्यासोबत नव्हती. अचानकपणे त्यांनी सरसंघचालकांची भेट घेण्याचे कारण काय, याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.