‘एसएमएस’ने तुटली लग्नगाठ
By admin | Published: February 27, 2015 01:56 AM2015-02-27T01:56:51+5:302015-02-27T01:56:51+5:30
केवळ एका एसएमएसमुळे एका तरुणीचे नववधू होण्याचे स्वप्न भंगले. वराने पाठ फिरवली. तो लग्नमंडपी पोहोचलाच नाही.
नागपूर : केवळ एका एसएमएसमुळे एका तरुणीचे नववधू होण्याचे स्वप्न भंगले. वराने पाठ फिरवली. तो लग्नमंडपी पोहोचलाच नाही. मात्र वर-वधूकडील वऱ्हाडी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
सीताबर्डी येथील या तरुणीचा विवाह सारनी, मध्यप्रदेश येथील रहिवासी अभिषेक याच्याशी जुळला होता. आज गुरुवारी हे लग्न मोठ्या थाटात पार पडणार होते. वधू पक्षाच्या माहितीनुसार वर पक्षाकडून लग्नघडीपर्यंत हुंड्याची मागणी होतच होती. वधूचे नातेवाईक भोपाळ येथे कपडे खरेदीसाठी गेले असता, अभिषेक नाराज होता. वधूच्या काका-काकूने त्याला नाराजीचे कारण विचारले असता, त्याने कारची मागणी व लग्नात नातेवाईकांचे थाटात स्वागत झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. या तरुणीच्या नातेवाईकांनी स्वागतात कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र कार देण्यास असमर्थता दर्शविली होती.
२५ जानेवारीला त्यांचे साक्षगंध झाले होते. त्यानंतर अभिषेक व या तरुणीची दररोज बातचित होत होती. दरम्यान अभिषेक १५ फेब्रुवारीला नागपुरात आला होता. अभिषेकने तिला एका हॉटेलात बोलावून राहुल नावाच्या युवकाचा एसएमएस आल्याची माहिती दिली. अभिषेकच्या सांगण्यानुसार राहुलने पाठविलेल्या एसएमएसमध्ये या तरुणीचे आणि त्याचे प्रेमसंबंध असल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतरही अभिषेकने तिच्यावर कुठलेही आरोप न करता विवाहाला अनुमती दर्शविली होती. मात्र लग्नाच्या तारखेच्या चार दिवसापूर्वी २२ फेब्रुवारीला अभिषेकच्या वडिलांचा फोन या तरुणीच्या नातेवाईकांना आला. त्यांनी २३ ला चर्चेसाठी बोलाविले.
तिथे एसएमएसवर चर्चा झाली. त्यावेळी या तरुणीच्या घरच्यांनी अभिषेकच्या कुटुंबीयांचा गैरसमज दूर केला. या तरुणीच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, त्यानंतर त्यांनी हुंड्यात कारची मागणी केली होती. या तरुणीच्या म्हणण्यानुसार तिची याप्रकरणात कुठलीही चूक नाही. अभिषेकचा गैरसमज दूर करण्यासाठी एसएमएस मागील खरे खोटे उघड करण्यासाठी सीताबर्डी ठाण्यात लिखित तक्रार केली होती. (प्रतिनिधी)