‘एसएमएस’ करताच होईल तुमच्या रेल्वे कोचची सफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 11:37 AM2018-03-14T11:37:30+5:302018-03-14T11:37:39+5:30
प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायक प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चलित हाऊस कीपिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या सेवेनुसार ५८८८८ या क्रमांकावर ‘एसएमएस’ करताच सफाई कर्मचारी हजर होऊन कोचची सफाई करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांना स्वच्छ आणि आरामदायक प्रवास घडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने चलित हाऊस कीपिंगची सुविधा उपलब्ध करून दिली असून, या सेवेनुसार ५८८८८ या क्रमांकावर ‘एसएमएस’ करताच सफाई कर्मचारी हजर होऊन कोचची सफाई करणार आहे.
बिलासपूरवरून सुरू होणाऱ्या आणि नागपूरमार्गे जाणाऱ्या नऊ रेल्वेगाड्यात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात छत्तीसगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, शिवनाथ एक्स्प्रेस, बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस, एर्नाकुलम एक्स्प्रेस, बिलासपूर-भगत की कोठी एक्स्प्रेस आदी रेल्वेगाड्यांचा समावेश आहे. या रेल्वेगाड्यात चलित हाऊस कीपिंगची सुविधा उपलब्ध असून, प्रवाशांनी ‘एसएमएस’ करताच एका ठराविक गणवेशातील सफाई कर्मचारी येऊन त्वरित कोचमधील सफाई करणार आहे. यासोबतच प्रवाशांना कोचमध्ये स्वच्छता राखण्यासाठी कचरा डस्टबिनमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या सुविधेचा लाभ प्रवासी सकाळी ६ ते रात्री १० यादरम्यान घेऊ शकतात. यात प्रवाशांना ‘क्लीन’ असे लिहून स्पेस दिल्यानंतर आपला १० अंकी पीएनआर क्रमांक ५८८८८ या क्रमांकावर ‘एसएमएस’ करावयाचा आहे.