छत्तीसगड, ओडिशासह साऊथमध्येही जाते तस्करीचे सोने
By नरेश डोंगरे | Published: September 29, 2023 10:27 PM2023-09-29T22:27:39+5:302023-09-29T22:28:03+5:30
रायपूरच्या मंडीत सोन्याची पाळंमुळं : 'कच्च्या मालात आत - बाहेरचे' अनेक खिलाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पकडले जात असतानाही दुबईतून नागपुरात मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी होते. तस्करीचा हा 'कच्चा माल' एमपी, छत्तीसगड, ओडिशासह साउथमध्येही जातो. तेथून तो पक्का होऊन विविध दागिन्यांच्या रुपाने ग्राहकांच्या हातात पोहचतो. अर्थातच यातून कोट्यवधींची उलाढाल होते.
गेल्या १० दिवसांत नागपूर विमानतळावर पाच किलोवर सोन्याच्या दोन बड्या खेप पकडल्या गेल्या. १० दिवसांपूर्वी १७०० ग्राम तर आज साडेतीन किलो तस्करीचे सोने जप्त करण्यात आले. यापूर्वीही विमानतळावर तस्करीचे मोठ्या प्रमाणात सोने पकडले गेले. वारंवार कोट्यवधींचे सोने पकडले जात असतानाही सोन्याच्या तस्करीवर त्याचा परिणाम होत नसल्याचे दिसून येते. तस्कर वेगवेगळी शक्कल लढवून, वेगवेगळ्या पद्धतीने सोन्याची तस्करी करतात अन् अनेक जण तपास यंत्रणांना चकमा देऊन सहिसलामत बाहेरही पडतात.
सूत्रांच्या मते, अशा प्रकारे आणल्या गेलेल्या सोन्याला संबंधित वर्तुळात 'पिवळा कच्चा माल' म्हटला जातो. हा कच्चा माल नागपूर विमानतळावरून बाहेर काढणारे एक मोठे रॅकेट अनेक वर्षांपासून नागपुरात आहे. काही वर्षांपूर्वी एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यालाच अशा प्रकारे हवाई मार्गे आणलेल्या तस्करीच्या सोन्याची खेप घेऊन जाताना पकडण्यात आले होते. त्यावेळी नागपूरचे नेटवर्क बरेच गाजले होते. या कारवाईनंतर नेटवर्क खिळखिळे झाले. नंतर मात्र अनेक कच्चे-पक्के खिलाडी या गोरखधंद्यात उतरले. त्यांची लिंक एमपी, छत्तीसगड, ओडिशा आणि साउथमध्ये आहे. नागपुरातून सर्व प्रांतात साधनांचा सुकाळ असल्याने त्या ठिकाणी येथून सहज आणि बिनदिक्कत तस्करीच्या सोन्याचे खेप तिकडे पोहचविली जातेे. सर्वाधिक सोने छत्तीसगडमध्ये पोहचत असल्याचीही सूत्रांची माहिती आहे.
तीनशेवर शहरात पोहचतो रायपूरचा माल
रायपूर शहरात सोन्याची मोठी मंडी आहे. संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, येथून छत्तीसगडसह अन्य प्रांतातील ३०० वर शहरात बिस्किटांसह वेगवेगळ्या दागिन्यांच्या रुपात सोन्याचा माल पोहचतो. अनेक छोटे खेळाडू पंजाब आणि दिल्लीसह रायपुरातूनच नागपूर विदर्भात सोन्याचा माल आणतात.