नागपूर विमानतळावर १६.६६ लाखांचे तस्करीचे सोने पकडले
By मोरेश्वर मानापुरे | Published: August 12, 2023 01:39 PM2023-08-12T13:39:01+5:302023-08-12T13:39:59+5:30
एअर अरेबिया विमानाने आला प्रवासी
नागपूर :नागपूर सीमा शुल्क विभागाच्या एअर कस्टम्स युनिट (एसीयू) आणि एअर इंटेलिजेंस युनिटच्या (एआययू) पथकांनी गुप्त माहितीच्या आधारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे सोन्याची तस्करी करणाऱ्या भारतीय पासपोर्ट असलेल्या एका युवकाला अटक केली. शमशाद अहमद असे तस्करी करणाऱ्या युवकाचे नाव असून तो लखनौ येथील रहिवासी आहे.
शमशाद एअर अरेबियाच्या जी९-४१५ या विमानाने नागपुरात आला होता. संशयाच्या आधारे अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत अधिकाऱ्यांनी बाजारभावानुसार १६.६६ लाख रुपयांचे २४ कॅरेटचे २८३ ग्रॅम सोने ताब्यात घेतले. शमशाद याने सोने अर्ध घन पिवळया रंगाच्या पेस्टचे विशेष डिझाईन केलेले पॅकेज गुदाशयात लपवून आणले होते. गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी युवकाची कसून तपासणी केल्यानंतर सोन्याची पेस्ट गुदाशयात आढळून आली. सोन्याचे भौतिक स्वरूप बदलण्यासाठी सोन्यामध्ये काही रसायने मिसळल्यामुळे ते अर्ध घन स्वरूपात बनले होते.
सीमा शुल्क चुकविण्यासाठी प्रवाशाने सोन्याची तस्करी केली आणि तो विमानतळाबाहेर एखाद्या व्यक्तीला पोचविणार होता. सीमाशुल्क कायदा, १९६२ अन्वये नागपूर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे.