आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये गोल्ड स्मगलिंग: धावत्या रेल्वेतून तस्कर जेरबंद; सव्वातीन किलो सोने जप्त
By नरेश डोंगरे | Published: January 22, 2024 08:01 PM2024-01-22T20:01:26+5:302024-01-22T20:01:42+5:30
डीआरआयची कारवाई, एकाला अटक, साथीदारांचा शोध सुरू
नागपूर: आझाद हिंद एक्सप्रेसमधून मोठ्या प्रमाणात तस्करीचे सोने नेले जात असल्याची टीप मिळाल्यानंतर डीआरआयने (महसुल गुप्तचर संचालनालय) तस्कराच्या मुसक्या बांधल्या. त्याच्या ताब्यातून चक्क सव्वातीन किलो सोने जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे सोने तस्करांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या कारवाईशी जुळलेले धागेदोरे शोधण्यासाठी जागोजागी छापेमारी सुरू असल्याने डीआरआयने कारवाईच्या पाच दिवसानंतरही अधिकृतपणे याबाबतची माहिती जाहिर केलेली नाही.
खास सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हावडा येथून पुण्याकडे निघालेल्या आझाद हिंद एक्सप्रेसमधून तस्करीच्या सोन्याची खेप घेऊन काही तस्कर नागपूर मार्गे जाणार असल्याची टीप डीआरआयला १७ जानेवारीला मिळाली होती. त्यावरून डीआरआयने आझाद हिंद एक्सप्रेसमध्ये कारवाईची तयारी केली. रात्री ७ च्या सुमारास ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावर आल्यानंतर डीआरआयच्या पथकाने आरपीएफच्या मदतीने संशयीत तस्कराला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चक्क सव्वा तीन किलो सोने सापडले. सुमारे दोन कोटी रुपये किंमत असलेल्या या सोन्याच्या खरेदी विक्री बाबत तस्करांकडून समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्याला अटक करून डीआरआयने त्याची चाैकशी चालविली आहे.
मुंबईत जाणार होते सोने
सूत्रांच्या माहितीनुसार, तस्करीचे हे सोने विदेशातून आणले होते आणि ते मुंबईत एका बड्या आसामीकडे जाणार होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे ताब्यात असलेल्या तस्करासह संबंधित साथीदारांकडे डीआरआयने चाैकशी चालविली आहे. त्यासाठी जागोजागी छापेमारी केली जात असल्याचेही सूत्रांचे सांगणे आहे. या तस्करीत आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याने पाच दिवस होऊनही या कारवाईबाबत डीआरआयने अधिकृत वाच्यता केलेली नाही.