चहाच्या पिशवीतून दारूच्या बाटल्यांची तस्करी; गुंटूरचा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 10:30 PM2023-06-27T22:30:47+5:302023-06-27T22:31:13+5:30
Nagpur News चहाच्या पिशवीतून दारूची तस्करी करणाऱ्या गुंटूर (आंध्र प्रदेश) येथील एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. अकला राधा कृष्णा राम बाबू रेड्डी (वय २४) असे त्याचे नाव आहे.
नागपूर : चहाच्या पिशवीतून दारूची तस्करी करणाऱ्या गुंटूर (आंध्र प्रदेश) येथील एका आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. अकला राधा कृष्णा राम बाबू रेड्डी (वय २४) असे त्याचे नाव आहे.
रेल्वे पोलीसच्या गुन्हे शाखेचे पथक सोमवारी सकाळी १० वाजता गुन्हेगारांचा शोध घेत असताना फलाट क्रमांक दोनवर अंदमान एक्सप्रेस आली. कोच नंबर एस. ४ च्या ५५ आणि ५६ नंबरच्या सीटखाली दोन पिशव्या आढळल्या. एकीवर प्रीमियम चहा, तर दुसरीवर महक सिल्वर पानमसाला असे लिहून होते. त्या पिशव्यांची तपासणी केली असता, त्यात ओल्ड मंक रमच्या ३० बाटल्या आढळून आल्या. या पिशव्या अकला रेड्डीच्या असल्यामुळे पोलिसांनी त्याला तसेच एका महिलेला ताब्यात घेतले.
बल्लारपूर-वर्धा मेमूमध्येही कारवाई
२४ जूनला अशीच एक कारवाई बल्लारपूर-वर्धा मेमू पॅसेंजरमध्येही करण्यात आली. आरोपी नयन वसंत गुंड (वय २५) आणि महेश प्रसाद पुरी (वय १८) या हिंगणघाटच्या दारू तस्करांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. चाैकशीत त्यांच्या ताब्यातून १३७ दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. धावत्या रेल्वेत गस्त करताना नागरी ते हिंगणघाट दरम्यान गुन्हे शाखेच्या पथकाने ही कामगिरी बजावली. या प्रकरणात वर्धा रेल्वे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या.
रेल्वेचे पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विकास कानपिल्लेवार, उपनिरीक्षक प्रवीण भिमटे, हवलदार महेंद्र मानकर, श्रीकांत धोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.
----