लाखोंच्या सुगंधित तंबाखू- गुटख्याची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:12 AM2021-08-13T04:12:27+5:302021-08-13T04:12:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - लाखोंचा सुगंधित तंबाखू -गुटखा नागपुरात घेऊन येणाऱ्या पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी जेरबंद ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - लाखोंचा सुगंधित तंबाखू -गुटखा नागपुरात घेऊन येणाऱ्या पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून सरकारने प्रतिबंधित केलेला सुमारे ९ लाखांचा गुटखा, सुगंधित तंबाखू, सुपारी आणि पान मसाला तसेच ट्रक आणि ऑटो असा २०.६७ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
प्रतिबंधित असलेला गुटखा- सुगंधीत तंबाखू मध्यप्रदेशातून नागपुरात येणार असल्याची टीप गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला बुधवारी मिळाली होती. त्यामुळे ते गिट्टीखदानमध्ये दबा धरून होते. सायंकाळी ६ च्या सुमारास आयशर ट्रक पोलिसांच्या नजरेस पडला. या ट्रकमधील मालाची विल्हेवाट लावण्यासाठी छोटे मालवाहू ऑटोही पोलिसांना दिसले. त्यामुळे पोलिसांनी तेथे छापा घालून अमर गोपाळराव तायवाडे (वय २३), विक्रम रामोजी घुघरे (वय २३, रा. दोघेही तळेगाव शामजीपंत), आदिल ईक्राम अली शेख (वय ३६, रा. आदिवासीनगर), फिरोज ऊर्फ राजू अशफाक खान (रा. अंसारनगर, मोमिनपुरा) आणि मतीनउल्ला रहमतउल्ला (रा. जाफरनगर) या पाच आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक संजय अढाऊ यांच्या नेतृत्वात सहायक निरीक्षक अनिल मेश्राम, उपनिरीक्षक अरुण सरवरे, हवलदार दीपक कारोकार, सुनील ठवकर, दिनेश चाफलेकर, सुनील वानखेडे, श्रीकांत साबळे, चंदू ठाकरे, सूरज भारती, उत्कर्ष राऊत, साईनाथ डब्बा, सचिन आंधळे, विकास चहांदे आणि नासिर शेख तसेच प्रफुल्ल पारधी यांनी ही कामगिरी बजावली.
---
कुठे जाणार होता माल?
हा माल नेमका कुठे जाणार होता, ते पोलिसांकडून स्पष्ट झाले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पकडण्यात आलेल्या आरोपींचा म्होरक्या मतीनउल्ला असून, तो या मालाची विल्हेवाट साथीदारांच्या मदतीने लावणार होता. लकडगंजमधील अनेक भागात सुगंधित तंबाखू, गुटख्याची धडाक्यात तस्करी होते. एक मोठे रॅकेटच त्यात सहभागी असून, काही भ्रष्ट पोलिसांसोबत त्यांची हातमिळवणी असल्याने महिन्याला कोट्यवधींच्या प्रतिबंधित मालाची तस्करी हे रॅकेट अनेक महिन्यांपासून करत आहे.
---